कराड : कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यांतील 13 हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा कॅनॉलला सैदापूर (ता. कराड) हद्दीत शनिवारी अचानक भगदाड पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहिले. रब्बी हंगामातील पिकांसाठी कॅनॉलला पाणी सोडण्यात आले होते, त्यादरम्यान हा प्रकार घडला.
ओढ्याला वाढलेले पाणी उसाच्या शेतात घुसल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. कृष्णा कालवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी उदय नांगरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कॅनॉलचे पाणी बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, मोरीचा तळ कमकुवत झाल्याने तो फुटला आहे. पुढील पंधरा दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करून कॅनॉलला पूर्ववत पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती उदय नांगरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.
निधीअभावी कृष्णा कॅनॉलची ठिकठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यांतील शेती व जनावरांच्या पाण्यासाठी हा कॅनॉल वरदान ठरला आहे. मात्र, कॅनॉलच्या डागडुजीकडे पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली आहे. पुलाजवळ प्लास्टिक व कचरा साचून राहिल्याने पाण्याचा प्रवाह गतीने पुढे सरकत नाही. कॅनॉलच्या मोऱ्यांनाही गळती लागली आहे.
याचाच परिणाम म्हणून सैदापूर हद्दीत ओढ्यावरील नलिका मोरीचा तळ अचानक फुटला. कॅनॉलला पाच दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहिले. ओढ्याची पाणी पातळी वाढल्याने कणसे यांच्या शेतात पाणी शिरून काही प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उदय नांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कॅनॉलचे पाणी तातडीने बंद केले. त्यामुळे नुकसान टळले. 225 क्युसेक पाणी वाहिल्याचे नांगरे यांनी सांगितले.
कृष्णा कॅनॉलचा सैदापूर हद्दीतील मोरीचा तळ कमकुवत झाला होता. तो फुटून ओढ्याला पाणी वाहिले. रब्बी हंगामाचे पाचवे आवर्तन सुरू होते. कॅनॉलचे पाणी बंद करण्यात आले आहे. मात्र, पुढील पंधरा दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करून कॅनॉलला पूर्ववत पाणी सोडण्यात येईल.- उदय नांगरे, उपविभागीय अभियंता, कृष्णा कालवा उपविभाग, कराड