सातारा

Satara News: सैदापूर ग्रामपंचायतीला मिळणार सौरग्राम ओळख

ग्रामपंचायतीपासून पाणीपुरवठ्यापर्यंत सर्व विभाग सौरऊर्जेवर; लाखो रुपयांची बचत

पुढारी वृत्तसेवा
अशोक मोहने

कराड : कराड तालुक्यातील सैदापूर ग्रामपंचायतीने सौरऊर्जेचा प्रभावी वापर करत राज्यातील आदर्श ‌‘सौरग्राम‌’ बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पाच किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले असून गेल्या पाच वर्षांपासून कार्यालयातील पंखे, दिवे, संगणक, सीसीटीव्ही यांसह सर्व विजेची गरज या सौरऊर्जेतून भागवली जात आहे. आता 4500 कुटुंबांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊससाठी 150 किलो वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

यातून महिन्याकाठी एक ते दीड लाख रुपयांची वीज बिलांची बचत झाली आहे. ग्रामपंचायतीतील सर्वात मोठ्या व खर्चिक मानल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी दीडशे किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. या प्रकल्पातून पावसाळ्यासह वर्षभर अखंडित वीजपुरवठा केला जातो. विद्यानगर परिसरातील सुमारे 4500 कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून पुढील दोन महिन्यांत 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. या सौर प्रकल्पातून दरमहा 10 ते 11 हजार युनिट वीज तयार होत असून याचा थेट फायदा ग्रामपंचायतीला मिळत आहे.

सौर प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च झाला असून तो वित्त आयोग आणि ग्रामपंचायत निधीतून करण्यात आला आहे. पूर्वी पाणीपुरवठ्यासाठी दरमहा तीन ते साडेतीन लाख रुपये वीजबिल भरावे लागत होते. मात्र, सौरऊर्जेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने या समस्येवर मात करत आता महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची बचत साध्य केली आहे.

पहिल्या टप्प्यात 80 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प राबवण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी आणखी 70 किलोवॅटचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे सैदापूर ग्रामपंचायत पूर्णपणे अक्षयऊर्जेवर चालणारी आणि खर्चावर नियंत्रण ठेवणारी आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT