Sahyadri Tiger Reserve 
सातारा

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीच्या कुशीत पर्यटनाचा नवा अध्याय; वर्षात ७४ हजार पर्यटकांची भेट

१ कोटी ३ लाखांचा मिळाला महसूल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा, जैवविविधतेचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला २०२५-२६ या वर्षभरात ७३ हजार ९७२ पर्यटकांनी भेट दिली. या पर्यटनातून शासनाला १ कोटी ३ लाख ७५ हजार २३५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वन्यजीव संवर्धनाचे केंद्र न राहता पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ म्हणूनही पुढे येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ ११६५.५७ चौ. किमी असून त्यापैकी ६००.१२ चौ.किमी कोअर आणि ५६५. ४५ चौ. किमी बफर क्षेत्र आहे. हा प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सह्याद्री परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या वनप्रदेशात आहे.

कोयना नदीचे खोरे, शिवसागर जलाशय, वारणा खोरे आणि चांदोलीचा वनप्रदेश यामुळे या भागाला पर्यावरणीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, दऱ्या, घनदाट जंगल आणि जलसाठे पर्यटकांना आकर्षित करतात. काही वर्षांपूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अत्यंत कमी होती. मात्र, आता परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे. २०२५ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चंदा आणि तारा या दोन वाघिणींचे स्थलांतर करण्यात आले. 'ऑपरेशन तारा' अंतर्गत वाघांची संख्या वाढवून सह्याद्रीमध्ये पुन्हा प्रजननक्षम वाघांची लोकसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मार्च २०२६ मधील नोंदीनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकृत वाघसंख्या सातवर पोहोचली होती. यामध्ये सेनापती, सुभेदार, बाजी आणि शिलेदार या नर वाघांसह स्थलांतरित वाघिणींचा समावेश आहे. पुढेही वाघांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. पर्यटकांना सुरक्षित, आनंददायी आणि निसर्गपूरक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे प्रकल्प परिसरात पर्यटनासाठी अधिक चांगले आणि पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
- तुषार चव्‍हाण, प्रकल्‍प संचालक, सह्याद्री व्‍याघ्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT