Sahyadri Tiger Reserve 
सातारा

Sahyadri Tiger Reserve: ‘सह्याद्री व्याघ्र’मध्‍ये साहसी पर्यटनाला चालना; मुनावळेतील जलपर्यटनासह विविध उपक्रमांना शासनाची मान्यता

स्थानिकांसाठी रोजगाराची कवाडे उघडली जाणार

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पश्‍चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात साहसी पर्यटनाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक सल्लागार समितीने मुनावळे, ता.जावली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पातून जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याबरोबरच दुर्गम भागातील पर्यटनाला आता जागतिक स्तरावरील मोठी ओळख प्राप्त होणार असून स्थानिकांसाठी रोजगाराची कवाडे उघडली जाणार आहेत.

यासोबतच शासनाच्या साहसी पर्यटन धोरणांतर्गत मुनावळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या साहसी पर्यटन उपक्रमालाही स्थानिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. जमीन, हवा आणि पाणी या तिन्ही माध्यमांतील साहसी पर्यटन उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव संस्थेने शासनाकडे सादर केला होता. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

दरम्यान, वन विभागाच्या प्रचलित नियमांचे काटेकोर पालन करून तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला कोणताही त्रास अथवा उपद्रव होणार नाही, याची दक्षता घेऊनच हे उपक्रम राबवण्याची अट परवानगी देताना घालण्यात आली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना धरण परिसरात पर्यटनाचा विस्तार होत असताना या परिसराची पर्यावरणीय संवेदनशीलता, वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे कडक निर्बंध याकडेही गांभीर्याने पहावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटनाशी संबंधित उपक्रमांसाठी परवानग्या, नियम व प्रशासकीय नियंत्रणाची चौकट अधिक कडक होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT