सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 8 पट्टेरी वाघ आणण्यासाठी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मंत्रालयातील उपमहासंचालक (वन्यजीव) डॉ. सुरभी राय यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांना याबाबत पत्र पाठवले. या पत्रात ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी असे आठ वाघ जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली.
राज्याच्या वन खात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सहा वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि दीड वर्षांपूर्वी प्राधिकरणाची परवानगी मिळाली. या प्रस्तावात तीनदा त्रुटी निघाल्या. त्या दूर करुन पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. वाघाच्या स्थलांतरासाठी या ठिकाणी कामदेखील सुरु करण्यात आले. 2022-23 मध्ये 50 चितळ सोडण्यात आले. त्यासाठी सुमारे दहा एकरचे कुंपण तयार करण्यात आले आणि या ठिकाणी प्रजनन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. जेणेकरुन संख्या वाढल्यानंतर ते चितळ व्याघ्र प्रकल्पात सोडता येतील. जानेवारी 2010 मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या या व्याघ्र प्रकल्पात वाघ नैसर्गिक स्थलांतर करुन येतो, पण तो स्थिरावत नसल्याचा इतिहास आहे. मात्र, डिसेंबर 2023 मध्ये स्थलांतर करुन आलेला वाघ या ठिकाणी स्थिरावला आहे.
सह्याद्रीत घुमणार 11 वाघांची डरकाळी...
व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना अभयारण्यात एक व चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन असे तीन वाघ आता या ठिकाणी आहेत. वाघाला आवश्यक असणारे खाद्य आता येथे उपलब्ध आहे. नवीन 8 आणि पहिले 3 अशा मिळून 11 वाघांची डरकाळी सह्याद्रीत घुमणार आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आणण्यासाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटचे तांत्रिक मार्गदर्शन मागवले जाणार आहे. डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने वाघ आणण्याची प्रक्रिया सुरु होईल. सुरुवातीला दोन वाघ आणले जातील. त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.-किरण जगताप, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प