सातारा : 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा शहरात झाले, तेव्हा 1993 साली या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अभयसिंहराजे भोसले. 99 वे साहित्य संमेलन जेव्हा सातार्यात होत आहे, त्याचे स्वागताध्यक्ष असतील, अभयसिंहराजेंचे सुपुत्र महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले. साहित्य संमेलनांच्या इतिहासात मंत्री असलेले पिता-पुत्र स्वागताध्यक्ष होण्याची पहिलीच घटना ठरणार आहे. ‘66’च्या कुशीत ‘99’चा झालेला जन्म सातारकरांसाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे.
सातारा हे केवळ ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग सौंदर्यासाठीच नव्हे, तर साहित्य - कला संस्कृतीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेले हे शहर आता मराठी साहित्य क्षेत्रातील महाकुंभ समजल्या जाणार्या साहित्य संमेलनांनी आणखी समृद्ध होवू पाहत आहे. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातार्याची घोषणा झाल्यानंतर या जिल्ह्यातील साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाची लाट संचारली. यानिमित्ताने यापूर्वी 1993 मध्ये राजधानी सातार्यात झालेल्या साहित्य संमेलनाला उजाळा मिळत आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले श्रीमंत अभयसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनात मराठी भाषेच्या शुद्धतेचा जागर झाला होता. या संमेलनातून सातार्याच्या साहित्य संस्कृतीला नवा साज प्राप्त करुन दिला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक महत्वाचे व्यासपीठ समजले जाते. या संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक व साहित्यप्रेमी एकत्र येत असतात. या संमेलनातून मराठी साहित्याला नवा आयाम मिळतो. अशा या महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचा मान पुन्हा एकदा सातार्याला मिळाला.अभयसिंहराजेंचे सुपुत्र असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हे ‘99’वे साहित्य संमेलन सातार्यात यावे यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, कार्यवाह सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची साथ मिळाल्याने सातार्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
आता राजधानी सातार्यात होणार्या या संमेलनातून मराठी भाषेचा गौरव, नव्या साहित्यिक प्रवाहांचा शोध व साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत होणार आहे. मात्र या निमित्ताने सातारा शहरात 1993 मध्ये झालेल्या 66 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले होते. या संमेलनात अनेक प्रसिद्ध साहित्यिक, कवी यांचा सहभाग होता. सातार्याच्या साहित्य क्षेत्राला उंची प्राप्त करुन देण्याचे काम या संमेलनाने केले होते. सातार्याला विशेष ओळख निर्माण करुन देणार्या या संमेलनाने साहित्यप्रेमींना उर्जा मिळाली. सातार्यात यापूर्वी 1905, 1962, 1993 मध्ये साहित्य संमेलने झाली होती. त्यानंतर आता होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन सातार्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले हेच या संमेलनाचे यजमान असल्याने ‘66’च्या कुशीत ‘99’चा झालेला जन्म साहित्य रसिकांसाठी मेजवानी ठरेल.
सातार्यात होणारे हे 4 थे संमेलन आहे. 1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 रे संमेलन 1905 साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली सातार्यात झाले होते. 1962 मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.