सातारा : सातारा येथे दि. 1 ते 4 जानेवारी अखेर होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लगबग सुरू झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील या प्रतिष्ठित संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन, आयोजक संस्था, साहित्यिक, स्वयंसेवक आणि विविध समित्या कामाला लागल्या असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
संमेलनासाठी स्वागत कमानी उभारणे, मुख्य व्यासपीठाची रचना, साहित्य प्रदर्शन, पुस्तक दालन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, पाहुण्यांची निवास व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच स्वच्छता व सुरक्षा यासंदर्भात सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, संमेलन स्थळ आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व फलकांनी सजवण्यात येत आहेत. संमेलनादरम्यान राज्यभरातून तसेच देश-विदेशातून नामवंत साहित्यिक, कवी, लेखक, समीक्षक, अभ्यासक व साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असल्याने सातारा शहर पुन्हा एकदा साहित्याच्या केंद्रस्थानी येणार आहे. विविध परिसंवाद, काव्यवाचन, पुस्तक प्रकाशन, लेखक भेटी, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम संमेलन रंगतदार करणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे स्थानिक कलाकार, प्रकाशक, विक्रेते तसेच पर्यटन व व्यवसाय क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेचे दर्शन घडवण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलन संस्मरणीय वयशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.