Rupali Chakankar on Vaishnavi Hagwane Case
सातारा - वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या विकृतीला कंटाळून जीवन संपवले, ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. ही घटना समजताच मी या प्रकरणांमध्ये सुमोटो दाखल केला आहे आणि बावधन पोलीस स्टेशनला याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. या विकृतीच्या विरोधात सर्वांना लढायचं आहे, अशी देखील प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली. आज महिला राज्य आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि खासदार सुनील तटकरे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
वैष्णवी प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, असे पक्षाच्या वतीने आमचे मत आहे.वैष्णवी मृत्यू प्रकरण हे निंदनीय कृत्य आहे. संबंधित नराधमवर कारवाई झालीच पाहिजे. कितीही जवळचे असले तरी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये स्वागतावेळी पालकमंत्री पदाचे बॅनर लागले आहेत. छगन भुजबळ यांचे पालकमंत्री पदाचे बॅनर लावले जरी असले तरी याविषयी निर्णय वरिष्ठ तीन नेते घेतील, असे तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याने सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आलीय. पण राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार आहेत.