Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Parali Shiv temple: परळीतील शिवमंदिर संवर्धनासाठी साडेसहा कोटी; ना. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याला यश

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार

पुढारी वृत्तसेवा

सातारा: परळी, ता. सातारा येथे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेली प्राचीन केदारेश्वर व महादेव मंदिर, या दोन शिवमंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून 6 कोटी 54 लाख 30 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.

परळी येथे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील केदारेश्वर व महादेव मंदिर, ही दोन मंदिरे 13 ते 14 व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या दोन्ही मंदिरात सुंदर कोरीव काम असून मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. सध्यस्थितीत मंदिरांची देखभाल न झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन ठेवा जतन करण्यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न व पाठपुरावा सुरु होता. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेणी यांचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत परळी येथील केदारेश्वर व महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार राज्य सरकारने या कामासाठी 6 कोटी 54 लाख 30 हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मंजूर निधीमधून या मंदिरांच्या जीर्णोद्धारासह विविध विकासात्मक कामे केली जाणार आहेत. केदारेश्वर व महादेव मंदिर हा पुरातन ऐतिहासिक, धार्मिक अनमोल ठेवा जतन व संवर्धन करण्यासाठी ना. शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाल्याबद्दल परळी खोऱ्यातील जनतेसह राज्यभरातील भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT