Ranjitsinha Naik Nimbalkar 
सातारा

Flood Diversion Survey: ‘फ्लड डायव्हर्जन’ सर्वेक्षणासाठी २४ कोटी मंजूर

रणजितसिंह निंबाळकर : मुख्यमंत्र्यांचे दुष्काळी भागाला रिटर्न गिफ्ट

पुढारी वृत्तसेवा

फलटण : सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागाचे भवितव्य बदलू शकणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘फ्लड डायव्हर्जन’ योजनेला मोठी गती मिळाली असून, या प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणासाठी २४ कोटी ५ लाख ६७ हजार १५ रुपयांच्या निधीस महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील दुष्काळी जनतेला दिलेले ‘रिटर्न गिफ्ट’ असल्याची भावना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

यावेळी रणजितसिंह म्हणाले, कोयना, कृष्णा, कुंबी, कासारी आदी नद्यांमधील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याची संकल्पना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. या योजनेअंतर्गत पावसाळ्यातील ९० दिवसांत सुमारे ५१ टीएमसी अतिरिक्त पाणी सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यात वळविणे शक्य होणार आहे.

सुमारे १७ ते १८ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ११० किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचे नियोजन आहे. या बोगद्यासाठी खडकांची तपासणी, ड्रिलिंग, भूगर्भीय चाचण्या आणि त्यानंतर निविदा राबवण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने अर्थसहाय्य करण्यासही अनुकूलता दर्शवली आहे.

या प्रकल्पामुळे सापतेवाडी ते आसू दरम्यान उभारण्यात येणाऱ्या बोगद्यामुळे बॅकवॉटर निरा गावापर्यंत सुमारे २० ते २५ किलोमीटरपर्यंत पोहोचेल. त्यातून धोम-बलकवडी, निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा आणि निरा देवघर या सिंचन व्यवस्थेत ५ टीएमसी पाणी इंजेक्शन पद्धतीने सोडले जाईल. त्यामुळे हे कालवे वर्षभर पाण्याने भरलेले राहण्यास मदत होईल.फलटणमधील बाणगंगा नदी प्रवाही ठेवण्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उपळवे येथून अर्धा टीएमसी पाणी सोडण्याची मागणीही केली.

सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण होऊन हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला, तर सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी दिलासा मिळेल. समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा शाश्वत वापर करून लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची क्षमता या योजनेत आहे.
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT