Vasota Fort Ropeway Project Pudhari
सातारा

Vasota Fort Ropeway Project: रोपवेमुळे ऐतिहासिक वासोटा किल्ल्यावर पोहोचणार काही मिनिटांत

मुनावळे ते वासोटा असा रोपवे तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून रोपवेचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना काही मिनिटांत वासोटा किल्ल्यावर पोहोचता येणार आहे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वासोटा किल्ल्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र, या किल्ल्याला भेट द्यायची झाल्यास मुनावळे तसेच बामणोली येथून बोटीने एक तास व तिथून किल्ल्याची चढण एक ते दीड तास असे दोन ते अडीच तासांचे अंतर पार करावे लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटकांसाठी आनंदाच्या बातमीची घोषणा अर्थसंकल्पात केली. मुनावळे ते वासोटा असा रोपवे तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून रोपवेचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना काही मिनिटांत वासोटा किल्ल्यावर पोहोचता येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यातील घनदाट जंगलात वसलेला वासोटा किल्ला (व्याघ्रगड) हा ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. बामणोलीतून बोटीने (शिवसागर जलाशय) प्रवास करत येथे पोहोचता येते, जिथे साहसी जंगल ट्रेक, किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य दृश्ये पाहता येतात. बामणोली किंवा मुनावळे येथून बोटीने अंदाजे 1 ते 1.5 तासांचा प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी (मेट इंदवली) पोहोचता येते.

वासोटा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात असल्याने, वन विभागाची (बामनोली, वन विभाग कार्यालय) पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. जंगल असल्याने किल्ल्यावर मुक्कामास बंदी आहे; ट्रेक एका दिवसात पूर्ण करणे आवश्यक असते. वासोटा किल्ल्यावर परदेशी पर्यटकही आकर्षित व्हावेत, यासाठी 100 टक्के डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.

सध्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जावं लागतं. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जवळपास अडीच ते तीन तासांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रोपवेच्या घोषणेमुळे अबालवृध्दांना तसेच व्याधीग्रस्तांनाही हा किल्ला पाहता येणार आहे.

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्याचे आणि रणनितीचे प्रतिक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्यात येणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT