Mahabaleshwar city: महाबळेश्वर शहरातील रस्ते ‌‘व्हेंटिलेटर‌’वर Pudhari Photo
सातारा

Mahabaleshwar city: महाबळेश्वर शहरातील रस्ते ‌‘व्हेंटिलेटर‌’वर

धुक्यातले शहर आता ‌‘धुरळ्या‌’त ; अधिकारी-ठेकेदार ‌‘गोतावळ्या‌’ने पर्यटक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : राज्याचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सध्या रस्त्यांच्या दुर्दशेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था असतानाच, शहरांतर्गत रस्त्यांचीही अक्षरशः वाताहत झाली आहे. महाबळेश्वर पालिका अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका थेट नागरिकांसह पर्यटकांना बसत आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील काही रस्त्यांची कामे घाईगडबडीत करून घेण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात ही कामे वाहून गेली. त्यामुळे ‌‘सर आली धावून, रस्तेच गेले वाहून‌’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेकडून सर्व प्रकारचे कर नियमितपणे वसूल केले जात असतानाही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

शहरात असा एकही रस्ता उरलेला नाही, जो धुळीच्या विळख्यात सापडलेला नाही. प्रशासकीय काळातील एककल्ली निर्णय प्रक्रियेमुळे अनेक सोसायट्या व मोहल्ल्यांकडे जाणारी रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. स्वच्छतेसाठी ठेकेदारांना कोट्यवधी रुपये दिले जात असताना, खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांच्या दर्जेदार दुरुस्तीसाठी मात्र निधी खर्च केला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

पूर्वी ‌‘ऑक्सिजन‌’वर असलेले महाबळेश्वरचे रस्ते आता थेट ‌‘व्हेंटिलेटर‌’वर गेले आहेत. नेहमी धुक्यात न्हालेलं महाबळेश्वर आता धुळीच्या लोटांत हरवले असून नागरिक व पर्यटक दोघेही श्वसनविकार व आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत. दुकानांमध्येही धुळीमुळे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेठ गंगाधर माखरिया शाळा ते कारवी आळी, मरीपेठ परिसर, विल्सन पॉईंट रस्ता, रांजणवाडी, हिरडा नाका, जय दुर्गा सोसायटी, अनारकली हॉटेल परिसर आदी भागांतील रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. अपघातांचे प्रमाण वाढले असून अधिकारी मात्र मर्जीतील ठेकेदारांना खुश करण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे. महाबळेश्वर पालिकेला शासनाकडून रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतानाही आधीच खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांची कामे कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, नूतन नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन, येत्या उन्हाळी हंगामपूर्वी महाबळेश्वर शहर व परिसरातील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने करून नागरिक व पर्यटकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT