Satara crime news: मुलगाच पाहिजेच्या हव्यासापोटी ऋतुजाचा बळी Pudhari Photo
सातारा

Satara crime news: मुलगाच पाहिजेच्या हव्यासापोटी ऋतुजाचा बळी

अवघा कारी परिसर अद्याप सुन्नच : मुलासाठीचा अट्टाहास थांबणार तरी कधी?

पुढारी वृत्तसेवा
सोमनाथ राऊत

परळी : पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातार्‍यासाठी कारी, ता. सातारा येथील घटना कलंकित करणारी ठरली. वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे या हव्यासापोटी पोटात बाळ असलेल्या ऋतुजा मोरे या निष्पाप विवाहितेचा बळी गेला. तिच्याबरोबर तीन वर्षाच्या चिमुकल्या स्पृहालाही जग कळण्याआधीच जावे लागले. या घटनेने भेदरलेला कारी परिसर तीन दिवसांनंतरही अद्याप सुन्नच आहे.

परळी खोर्‍यातील कारी येथे हृदय हेलावणारी घटना घडली होती. गर्भवती मातेने चिमुकल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मातेसह एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला. विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्यामुळे एका चिमुरडीचा जीव वाचवता आला. या घटनेत गर्भातील बाळहीदगावले. ऋतुजा विशाल मोरे (वय 27), स्पृहा विशाल मोरे (3) या मायलेकींचा मृत्यू झाला, तर त्रिशा विशाल मोरे (6) ही चिमुरडी या घटनेत बचावली आहे.

ऋतुजाच्या आईने मोठ्या आनंदाने जवळच्याच कारी गावात तिचे लग्न लावून दिले. दरे गाव आणि कारी हे अंतरही जास्त नाही. अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर. आपली मुलगी आपल्या नजरेत राहील, अशी भाबडी आशा या बिचार्‍या आईची होती. ऋतुजाची सासूही तिच्या माहेरच्या दरे (आरे दरे) गावचीच म्हणजे सोयर सुतकही अगदी जवळच, परंतु लग्नानंतर सासरकडच्या अपेक्षा वाढतील किंवा ते इतक्या खालच्या थरास जातील, अशी अपेक्षाही या कुटुंबाला नव्हती.

लग्नानंतर काही दिवसांतच ऋतुजा आणि तिचे पती विशाल हे मुंबईला स्थायिक झाले. चार-सहा महिने जाताच तिचा पती आणि सासू यांनी तिच्या पाठीमागे ससेमेरा सुरू केला. पती विशाल, सासू अलका यांनी तिच्या पाठीमागे लग्नात खर्च कमी केला म्हणून जाचहाट केल्याचे या संदर्भात पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गोष्टीने ऋतुजाचा कोंडमारा होत होता. ती या गोष्टी माहेरीही सांगू शकत नव्हती. कारण माहेरची परिस्थिती बेताची होती. होणारा त्रास ती सहन करत होती, अशातच तिला पहिलं अपत्य मुलगी त्रिशा झाली. दुसरं अपत्यही मुलगीच झाली. दोन्ही अपत्य मुली झाल्यावर तिच्या छळात वाढ झाली होती. तिला जाचहाट होत होता. गणपतीसाठी गावी आल्यानंतरही हा त्रास सुरूच होता, असे तक्रारीत म्हटले आहे. जाचहाटाच्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक झाल्याने तिचा शहर सहनशक्तीचा बांध फुटला अन् ती दुर्दैवी घटना घडली. ऋतुजाने दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. त्यातून त्रिशा एकटीच बचावली. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले.

अजून किती ऋतुजा बळी पडणार आहेत?

आज ऋतुजा नाही पण तिच्या मरणामागची वेदना, तिच्यावरचा अन्याय आणि छळ समाजाला विचार करायला भाग पाडतो आहे. अजून अशा किती ऋतुजा समाजातील विचाराला बळी पडणार आहेत?. मुलींबद्दलचा अन्यायकारक दृष्टिकोन आणि घरातील स्त्रीवर होणारा मानसिक, शारीरिक छळ अजूनही कित्येक कुटुंबांच्या चार भिंतीत दडलेला आहे. त्यांची घुसमट कधी थांबणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT