सातारा; पुढारी वृत्तसेवा : यंदाचा उन्हाळा कधी नव्हे एवढा 'ताप'दायक ठरू लागला आहे. आग ओकणारा सूर्य जगणं नकोसं करत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जीवाची तगमग होत असून उन्हाचा चटका जिव्हारी लागत आहे. नागरिक घामाघूम होत असून जनजीवन होरपळून गेले आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून पंख्यांची हवाही गरम वाफा सोडत आहे. रखरखत्या उन्हाच्या झळा आरोग्यासाठी तापदायक ठरत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवनावर वाढत्या उष्म्याचा परिणाम झाला आहे.
घरातील पंख्यातूनही आता गरम वारे येऊ लागल्याने लोकांच्या दिवस-रात्रीच्या झोपाही उडाल्या आहेत. महिला, युवती डोक्याला व तोंडाला स्कार्फ बांधूनच घराबाहेर पडत आहेत. या उन्हाचा गावोगाच्या संपत आलेल्या यात्रांवरही चांगला परिणाम झाला होता. नागरिक दिवसाऐवजी पै-पाहुण्यांकडे सायंकाळी भोजनासाठी गेल्याचे दिसत आहेत.
अनेकदा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी ठिकठिकाणी रस्त्याकडेचे मोठ मोठे वृक्ष तोडले जातात. त्यामुळे त्या त्या रस्त्यांवरील सावली हरवली आहे. सहापदरीकरणामुळे महामार्गावरील प्रवास तर उन्हाळ्यात नकोसा होत आहे. विशेषत: दुचाकीवर भर उन्हाचा प्रवास म्हणजे घामाघूम होऊन जात आहे. अनेक रस्त्यांच्या दुतर्फा पूर्वी वडाची झाडे होती. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना दाट सावली मिळायची. परंतु, सध्या वाढत्या वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने ही झाडे तोडली. परिणामी कडक उन्हातच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
रखरखत्या उन्हाच्या झळा आरोग्यासाठी तापदायक ठरू लागला आहे. अनेक नागरिकांना थकवा आणि शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास जाणवू लागला आहे. उष्माघात होण्याइतके कडक तापमान सध्या जाणवू लागले असून त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सध्या शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन) आणि थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.
डोळे येण्याचा त्रासही लहान मुलांमध्ये निर्माण होऊ शकतो. ज्यांना उन्हात बाहेर फिरावे लागते त्यांच्या चेहर्यावर बर्नसदृश्य लक्षणे दिसत असतात. अतिउन्हामुळे चेहर्याला आणि त्वचेला खाज सुटणे, त्वचा लाल होणे, त्यावर पुरळही उठणे, उन्हामुळे नाकातून रक्त येण्याची प्रकृती असलेल्या रुग्णांना घोणाळा फुटण्याचा धोका असतो. उन्हाच्या तडाख्याने अचानक बेशुद्ध पडणे, रक्तदाब अचानक कमी होणे अशी लक्षणे उष्माघातात दिसतात. उष्माघातावर त्वरित उपचार न केल्यास तो जीवावर बेतू शकतो. वाढत्या उन्हामुळे गरजेपोटी बाहेरचे दूषित पाणी पिण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे जुलाब आणि उलट्या यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
तापमान वाढीमुळे आरोग्याच्याही समस्या उद्भवत असून वृद्ध व लहान मुलांना तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. थकवा, डोकेदुखी, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, अचानक रक्तदाब कमी होणे, मानसिक अस्वास्थ्य, बेशुद्धावस्था अशी उष्माघाताची लक्षणे दिसत आहेत.
रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखा, कुलर किंवा वातानुकूलित यंत्रणा सुरू करावी. त्याच्याभोवती गर्दी टाळावी. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. त्यांच्या कपाळावर थंड पाण्यात भिजवलेल्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात.
अधिक तापमानात फार वेळ कष्टाची कामे नकोत. कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी झाल्यावर करावीत. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे टाळावेत. सैलसर, पांढर्या किंवा फिक्या रंगांचे कपडे वापरावेत. उन्हात काम करताना अधूनमधून सावलीत विश्रांती घ्यावी. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल जरूर घालावा. उष्माघात झाल्यासारखे वाटू लागले तर ताबडतोब उपचारांना सुरुवात करावी.