सातारा : सलग होत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची झळ आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागली आहे. शुक्रवारी तीन रुपये व मंगळवारी एक रुपये डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे मालवाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी, दररोज लागणारे दूध, पाव, पालेभाज्या आणि किराणा माल महागला आहे. एकीकडे महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले असताना दुसरीकडे कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
शेतातून मुख्य बाजारापर्यंत आणि तिथून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत भाजीपाला पोहोचवण्याचा खर्च वाढल्याने टोमॅटो, कोबी आणि इतर पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागातून दूध संकलन करणाऱ्या आणि शहरात वितरण करणाऱ्या गाड्या डिझेलवर चालतात. यामुळे दूध, दही, पनीर, तूप महागले आहे. गहू, तांदूळ आणि डाळींची इतर राज्यांतून होणारी वाहतूक महागली आहे.
तसेच परदेशातून येणाऱ्या खाद्यतेलाचा वाहतूक खर्च वाढल्याने कढईतले तेल महाग झाले आहे. कपडे-भांड्यांचे साबण, डिटर्जंट पावडर आणि महिलांची सौंदर्यप्रसाधने व सॅनिटरी नॅपकिन्सच्या किमती कंपन्यांनी वाहतूक खर्च वाढल्याचे सांगून वाढवत आहेत. रिक्षा, टॅक्सी व प्रवासाचे भाडे वाढल्याने नोकरदार महिलांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. इंधन दरवाढीमुळे जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर स्कूल बस आणि व्हॅन चालकही महिन्याची फी वाढवण्याची शक्यता आहे.