मीना शिंदे
सातारा : बदलती जीवनशैली, वाढत्या अपेक्षा, स्पर्धा, बेकारी, आर्थिक चणचण यामुळे कौटुंबिक कलह वाढत आहेत. त्यातून हिंसाचाराला बळ मिळत असल्याने कौटुंबिक स्वास्थ्य ऐरणीवर येत आहे. कौटुंबिक हिंसाचाराविरोधात तीन वर्षात सातारा जिल्ह्यातील 4093 महिलांनी शासनाचे दार ठोठावले आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिलांच्या तक्रारींचे निवारण, समुपदेशन तसेच न्यायिक मदतीसाठी समुपदेशन केंद्रांमध्ये धाव घेत दाद मागितली आहे.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत असून त्यामध्ये टिकण्यासाठी प्रत्येकालाच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ताणतणावही वाढत आहेत. आधी कोरोना व नंतर कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या आक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगारीची तलवार लटकत आहे. महागाईचा आलेख उंचावत असल्याने खर्च वाढत आहे तर उत्पन्न कायम असल्याने आर्थिक ओढाताण होत आहे. याचबरोबर राहणीमानातील बदलांमुळे अपेक्षा वाढत आहेत. यासर्व कारणांमुळे कौटुंबिक कलहही वाढत आहेत.
अद्यापही समाजव्यवस्थेवर पुरुषप्रधान संस्कृतीचे गारुड कायम आहे. आधुनिकतेचा शेला पांघरला तरी अनेक कुटुंबात स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्यानेही कौटुंबिक कलहांना तोंड फुटते. छोट्या खटक्यांचे मोठ्या वादळांत रुपांतर होते. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांचे शारीरिक मानसिक आरोग्य व सुरक्षितता धोक्यात येत आहे. यामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त महिला भावनिक, शारीरिक व मानसिक किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात बळी पडणाऱ्या महिलांसाठी शासनाच्यावतीने जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत समुपदेशन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिला शासनाचे दार ठोठावतात, तेव्हा त्यांना या समुपदेशन केंद्रांमधून वैद्यकीय, कायदेशीर व न्यायविषयक मदत दिली जाते. जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण, दहिवडी येथील समुपदेशन केंद्रांमध्ये मागील चार वर्षात 4 हजार 93 कौटुंबिक हिसाचाराच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. समुपदेशन केंद्रांमध्ये महिलेसह कुटुंबियांचे समुपदेशन करुन प्रसंगी कायद्याच्या आधारे या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. परंतू आधुनिक आणि समानतेच्या गप्पा मारणाऱ्या समाजात आजही कौटुंबिक हिसाचाराच्या घटना वाढत असल्याने कौटुंबिक स्वास्थ्य हिरावले जात आहे. तसेच महिला सुरक्षा व आरोग्यही ऐरणीवर येत आहे.