सातारा : सातारा शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डोळ्यातून पाणी व घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. डोळे येण्याचा संसर्ग प्रामुख्याने सुरुवातीला एका डोळ्याला होतो. मात्र काही दिवसांतच दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आधीच वातावरणातील बदलांमुळे त्रस्त असलेले सातारकर आता डोळे येण्याच्या साथीमुळे हैराण झाले आहेत. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शक्यतो बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तसेच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांनी घरीच राहून विश्रांती घ्यावी, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यापासून ही साथ अधिक प्रमाणात पसरू लागली असून, या आजारात डोळ्यांना सूज येणे, खाज येणे आणि लालसरपणा जाणवतो. अशाच प्रकारची लक्षणे मुंबईतही आढळून येत आहेत. डोळ्यांवर कोणतेही घरगुती उपाय करू नयेत, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
डोळे येण्याचा संसर्ग सुरुवातीला एका डोळ्याला होतो; मात्र नंतर तो दुसऱ्या डोळ्यालाही होतो. अनेकांना एकदा डोळे आले की पुन्हा हा संसर्ग होत नाही, असा गैरसमज असतो. मात्र तसे नसून, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही त्याच व्यक्तीला पुन्हा डोळे येऊ शकतात. त्यामुळे निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे.
संसर्ग झाल्याची लक्षणे कशी ओळखाल?
डोळ्यांत सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे ही या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे प्रथम एका डोळ्यात आणि नंतर दुसऱ्या डोळ्यात दिसून येतात. डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना व पापण्यांच्या आतील भागाला सूज येऊन लालसरपणा दिसतो. तसेच डोळ्यांतून चिकट स्त्राव बाहेर येतो. डोळ्यांना खाज येणे, डोळे जड वाटणे, तीव्र प्रकाश सहन न होणे अशी लक्षणेही जाणवतात. काही रुग्णांमध्ये डोळे येण्यासोबत ताप, सर्दी व खोकलाही दिसून येतो.