कराड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीची लगबग अपेक्षित असताना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. चांगल्या प्रतिचा तांदूळ प्रतिकिलो वीस ते पंचवीस रुपयांनी वाढला आहे. तर दूरडाळ दहा ते बारा रूपयांनी वाढल्याने किराणा भुसार असो.च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजीपाला, किराणा माल, खाद्यतेल, डाळी, दूध यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्चाचे गणित विस्कळीत झाले आहे. उत्पन्नाच्या तुलनेत वाढता खर्च भागविताना महिला व मध्यमवर्गीय कुटुंबांची मोठी कसरत होत असून, कराड बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटत आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच घरखर्चासाठी मोठी रक्कम खर्च होत असल्याने महिनाअखेरीस आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. पूर्वी सहजपणे केली जाणारी खरेदी आता विचारपूर्वक केली जात असून, गरजेपुरत्याच वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अनावश्यक वस्तूंची खरेदी अनेकांनी जवळपास बंद केली आहे.
घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, प्रवास, औषधोपचार यांसारख्या खर्चात कपात करणे शक्य नसल्याने वाढत्या महागाईचा सर्वाधिक भार अन्नधान्य व किराणा खर्चावर पडत आहे. त्यामुळे महिन्याच्या उत्पन्नातून बचत करण्यासाठी शिल्लक रक्कमच राहत नसल्याची नागरिकांची भावना आहे. कराडच्या मुख्य बाजारपेठेसह भाजी मंडईत ग्राहकांची वर्दळ असली तरी पूर्वीच्या तुलनेत खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. किलोऐवजी अर्धा किलो, पाव किलो अशी मोजकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वाढत्या महागाईचा फळका बसत आहे.