Retired pensioners boycotted the pension court held in Satara Panchayat Samiti.
सातारा पंचायत समितीत घेण्यात आलेल्या पेन्शन अदालतीत सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी बहिष्कार टाकला. Pudhari Photo
सातारा

पेन्शन अदालतीवर सेवानिवृत्तांचा बहिष्कार

पुढारी वृत्तसेवा

कोडोली, पुढारी वृत्तसेवा : सातारा पंचायत समितीमध्ये बुधवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी अदालत सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये ‘माझा स्टाफ अकार्यक्षम’ असल्याचे कारण सांगून काढता पाय घेतला. यामुळे पेन्शन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या अदालतीवरच बहिष्कार टाकला. यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली.

सातारा पंचायत समितीत बुधवारी सकाळी 10 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी पेन्शन अदालतीचे नियोजन केले होते. या अदालतीसाठी 150 ते 170 सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता बुध्दे हे सभागृहात आले. आल्या आल्याच त्यांनी चर्चा करण्यास सुरूवात केली. यावर पेन्शनर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी थोडा वेळ थांबूया आणखी भरपूर पेन्शनर येणार असल्याचे बुध्दे यांना सांगितले.

यावर बुद्धे यांचा पारा चढला. त्यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना माझ्या जवळचा स्टाप अकार्यक्षम असून मला तुमच्या अडचणी सोडवता येत नाहीत. तुम्ही तुमचे प्रलंबित आर्थिक प्रश्न व समस्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अर्थ विभागाचे प्रमुख यांच्याकडे मांडा, असे म्हणत अदालतीतून काढता पाय घेतला. बुध्दे निघून गेल्यानंतर पेन्शनरांना समस्या कोणाकडे मांडायच्या? असा प्रश्न पडला. यावरून कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या अदालतीसाठी आयोजित केलेल्या चहापानावरही पेन्शनर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बहिष्कार टाकला. या प्रकाराची पंचायत समितीत दिवसभर चर्चा सुरू होती.

या पेन्शन अदालतीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, दीपक जाधव, जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष बा.बा. शिंदे, म.गं.जाधव, गौतम माने, ज. ज. जाधव, नारायण कणसे, माणिकराव पवार, जागृती केंजळे, ललिता बाबर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT