सातारा : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कालावधीत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू होता. कुणाचाच वचक नसल्याने अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही सुरू होती. मात्र, आता निवडणूक झाली आहे. पदाधिकारी आले आहेत. झेडपी कारभाराच्या चाव्या आता अधिकाऱ्यांकडून पदाधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. लोकप्रतिनिधी जनतेचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांचा मान सन्मान राखा; अन्यथा इतरत्र बदल्या करून घ्या, असे खडे बोल ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
बोराटवाडी, (ता. माण) येथील ग्रामविकासमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, कृषी सभापती लता कर्णे, महिला बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रकल्प संचालक विश्वास सिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ना. गोरे यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून झेडपी कारभाराचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाचा लेखाजोखा मांडला. यानंतर शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्या निलंबनाचा विषय चर्चेला आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या पदस्थापनेवेळी झालेल्या घडामोडीवरून शिक्षणाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यानंतर प्रत्येक विभागाचे अधिकाऱ्यांकडून त्यांचे कामकाज, प्रलंबित विकास कामे, कामकाजाचा आढावा घेतला.
चोपडे यांच्या निलंबनाची री ओढत ना. गोरे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. गेली ८ वर्षे झेडपीच्या निवडणुका नसल्याने अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही सुरू होती. त्यामुळे नवीन पदाधिकारी आले तरी अधिकारी कोणाचेच ऐकत नाहीत, असे गोरे म्हणाले.
..तर निलंबनाची कारवाई
अधिकाऱ्यांनी झेडपी पदाधिकाऱ्यांचा मान-सन्मान राखावा. त्यांनी सांगितलेली कामे वेळेत करावीत. हे कुणाला जमत नसेल त्यांनी अर्ज करावा मी बदल्या करतो; मात्र साताऱ्याच्या नावाला बट्टा लावलेला मला चालणार नाही. आता शिस्तभंगाची नाही तर थेट निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ना. गोरे यांनी दिला.