सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील अपहार प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत. सातारा जिल्ह्यातील शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढण्याच्या अनुषंगाने सर्वांनी कामकाज करण्याबाबत अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सूचना केल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेमधील विविध विभागाचा आढावा आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.
सातारा जिल्हा परिषदेच्या सन 2020 ते 2024 यावर्षाच्या वार्षिक तपासणीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे साताऱ्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चार वर्षाच्या वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर आयुक्त नितीन माने, रवींद्र कणसे, सहाय्यक आयुक्त विजय धनवटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, राहुल देसाई, नागेश ठोंबरे, प्रज्ञा माने, कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी, अमर नलावडे, गौरव चक्के उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सातारा जिल्ह्यातील अंगणवाड्यातील कमी वजनाच्या बालकांवर विशेष लक्ष देऊन त्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात यावी, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम हाती घेऊन त्याबाबत दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. सर्व खातेप्रमुखांनी क्षेत्रीय भेटी देऊन जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असणारी विविध विकास कामे, योजना, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरेाग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामपंचायती व अंगणवाडी यांना भेटी द्याव्यात. महालेखापाल, स्थानिक निधी लेखा शकांच्याबाबत विशेष शिबीरांचे आयोजन करून शक पूर्तता करुन जास्तीत लेखाआक्षेप वगळण्याबाबतच्या सूचना केल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, धनंजय चोपडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे, सर्व गटविकास अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नीलेश घुले यांनी प्रास्ताविक केले. राहुल देसाई यांनी आभार मानले.