सातारा : सातार्यातील मार्गांना ‘रिलायन्स जिओ’चे ग्रहण लागले आहे. सातारा-मेढा महामार्गावरील करंजे नाका ते मोळाचा ओढा यादरम्यान रिलायन्स जिओ कंपनीकडून टाकण्यात येणार्या 5 जी नेटवर्कसाठी महामार्ग जेसीबीच्या सहाय्याने खोदण्यात आला आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना आणि रस्त्याची दुरूस्ती शक्य नसताना केलेल्या खोदकामामुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रिलायन्स जिओने यापूर्वी 4 जी नेटवर्कसाठी सातारा शहरातील रस्त्यांचे खोदकाम करून वाट्टोळे केले होते. आता मोळाचा ओढा ते करंजे नाका यादरम्यान रिलायन्स जिओने जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू केले आहे. खोदकामानंतर मार्ग लगेचच दुरूस्त करता येणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तांत्रिकदृष्टीने 15 मेनंतर डांबरीकरणाची कामे बंद केली जातात. डांबरीकरणासाठी आवश्यक असलेले वातावरण या कालावधीत नसते. तरीही रेटून कामे केल्यास ती दर्जाहीन होतात. त्यामुळे यंत्रणा याबाबीची काळजी घेत असता. रिलायन्स जिओ कंपनीने केलेल्या खोदकामावर पॅचवर्क केले तरी ते किती टिकेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आगामी आठ ते दहा महिने हे रस्ते उखडलेल्या स्थितीतच राहण्याची शक्यता आहे. तसे झाले तर नागरिकांना यामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.
सातारा-मेढा मार्ग हा केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठीसुद्धा महत्वाचा मार्ग आहे. मोळाचा ओढा, करंजे नाका या परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. उखडलेल्या रस्त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याचा संभव अधिक आहे. रिलायन्स जिओच्या ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व सातारा पालिकेने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणार्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. रिलायन्स जिओकडून शहरात 5 जी सेवा सुरू होणे ही सकारात्मक बाब असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा दुर्लक्षित होता, हे दुर्देवी आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या मुलभूत गरजांना आणि सुरक्षितता धोक्यात घालणे हे कुठल्याही प्रकारे योग्य नाही. रिलायन्स जिओने खोदलेले रस्ते तत्काळ पूर्ववत केले जातील, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.