सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील सातारा ते पुणे या रस्त्याचे काम रिलायन्स इन्फ्रातर्फे करण्यात आले होते. मात्र, या कंपनीबाबत लोकप्रतिनिधींसह जनतेच्याही तक्रारी होत्या. त्यातून केंद्र सरकारने रिलायन्सकडील सातारा-पुणे रस्त्याचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारलाच वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांकडे हे काम देऊ नये, तसेच नवीन डीपीआरमध्ये महामार्गावरील सर्वच समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पुणे ते सातारा या रस्त्याचे काम रिलायन्सकडे होते. जवळपास 42 हजार कोटींचे हे काम होते. आता ते रद्द करून या कामाचा पुन्हा केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग आढावा घेत आहे. पुण्यातील बायपासच्या सर्व्हिस लेनचं कामही विभागातर्फे सुरु करण्यात आलं आहे. यासोबतच 926 कोटी रुपये खर्चून खंबाटकीतील दोन बोगद्यांची कामे देखील सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोनपैकी एक बोगदा लवकरच सुरु करु, असे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिले होते. तरीही हे काम पूर्ण व्हायला किमान वर्षाचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, सातारा-पुणे मार्गावर सहापदरीकरणाची कामे बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली असली तरी सेवा रस्त्यांच्या देखभालीबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ते पूर्णपणे उखडलेले असून जागोजागी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन वाहन चालकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. वाहन चालकांसाठी धोकादायक ठरु पाहणारा या सेवा रस्त्यांवर मृत्यू दबा धरुन बसलाय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वाहन चालकांना विशेषत: दुचाकी चालकांची वाहने खड्ड्यात आदळत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालक जायबंदीही होत आहेत.
साताऱ्यात कॅटलपास करा...
साताऱ्यातील खिंडवाडी परिसरामध्ये वन्यजीवांच्या कॉरिडॉरमधून पुणे-बंगळूर हा महामार्ग जातो. त्यामुळे रस्ता ओलांडताना सातत्याने वन्यजीवांचा अपघात मृत्यू झाला आहे. अजिंक्यतारा ते पाटेश्वरचा डोंगर अशी भ्रमंती करणाऱ्या बिबटे, हरणे यांचा कॉरिडॉरच महामार्गामुळे धोक्यात आला आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने याबाबत दुर्लक्ष केले होते. आता नवा डिपीआर करत असताना खिंडवाडी येथे मोठा कॅटलपासचा समावेश करणे जरुरीचे आहे.
दरमहा रस्ते प्राधिकरण महामंडळाच्या सक्षम अधिकाऱ्याने समक्ष पाहणी करावी व तसा अहवाल तयार ठेवावा. तसेच रस्त्याकडेला असलेले पथदिवे हे रात्रीच्या वेळी सुरू असावे. महामार्गावरील चढ उताराच्या रस्त्याचे प्रमाण कमी करावे. तसेच महामार्गावरील दुभाजकात असलेले गवत खाण्यासाठी येणाऱ्या गायी, म्हशी व संबंधित शेतकऱ्यांना तेथे येण्यास मनाई करावी.- शामराव पाटील, वाहनधारक