कराड : वीज आमच्या उशाला, सौरऊर्जा कशाला, हा शेतकर्यांचा सरकारला सवाल आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती होत असताना सुद्धा राज्यातील शेतकर्यांना हक्काची दिवसा दहा तास वीज मिळत नाही. शिवाय नवीन वीज कनेक्शन बंद केली आहेत. सौर उर्जेवर शेतीपंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकर्यांसमोर शेती पाण्याचे संकट उभा ठाकले आहे.
शेती पंपाला सध्या दिवसा आठ तास व रात्री आठ तास वीज मिळत आहे. एक मार्चपासून हे नवीन वेळापत्रक आले आहे. उन्हाळ्याचा विचार करता दिवसा दहा तास वीज अपेक्षित आहे. पण तेवढी वीज सध्या मिळत नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके सुकत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा शेतकर्यांना हककाची वीज मिळत नाही. सरकारला सौर ऊर्जेचे पंप खपवायचे आहेत, यातून पैसे कमवायचे आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
शेती पंप सौरऊर्जेमुळे पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्याचा दुरूस्तीचा खर्च खूप आहे. येणार्या काळात शेतकर्याला ते परवडणारे नाही. विजेवर चालणारी तीन एचपीचा विद्युत पंप सौरऊर्जेच्या पाच एचपीपंपा पेक्षा जास्त क्षमतेने चालू शकतो ही वस्तुस्थिती आहे. सरकारने सात महिन्यांपासून शेती पंपासाठीचे वीज कनेक्शन बंद केली आहेत. सौरऊर्जेचे पंप शेतकर्यांना दिले जात आहेत. पण सौरउर्जेबाबत शेतकरी समाधानी नाहीत. शेतकर्यांच्या मागणीप्रमाणे शेती पंपाला वीज दिली जात नाही. दिवसा दहा तास वीज गरजेची आहे, ती मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.
जोपर्यंत शेतकर्यांना त्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नाही तोपर्यंत सरकारला शेतकर्यांना मोफत वीज, यंत्रसामग्रीसाठी अनुदान या योजना चालू ठेवाव्याच लागतील. सरकारने पूर्वीप्रमाणे शेतकर्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वीज द्यावी. तसेच सौर ऊर्जेचा हट्ट न धरता वीज कनेक्शन सुरू करावीत.- पंजाबराव पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना