Water Supply by tankers in satara
टँकरद्वारे पाणी लोकांना दिले जात आहे.  Representive Photo
सातारा

जिल्ह्यात टँकरच्या संख्येत घट

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत पुनरूज्जीवित झाले आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील टँकरची संख्या 189 ने घटली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात 218 टँकरने टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, सध्या 39 गावे व 146 वाड्यामधील नागरिकांना 29 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस सातारा जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे भूजल पातळीही कमालीची घटली होती. धरण, तलावामधील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये एक वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. कडक उन्हाळा असल्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवू लागली. त्यामुळे टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. जूनमध्येच मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील सर्वच भागात हजेरी लावली. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत पुनरूज्जीवित झाले आहेत.

माण तालुक्यात पांगरी, मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, हिंगणी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वाकी, परकंदी यासह 20 गावे व 237 वाड्यामधील 45 हजार 575 नागरिकांना 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात मोळ, शिंदेवाडी, नवलेवाडी, गारूडी, गारळेवाडी यासह 5 गावे व 4 वाड्यामधील 5 हजार 297 नागरिक व 996 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगावमध्ये 9 गावामधील 15 हजार 800 नागरिक व 10 हजार 56 जनावरांना 8 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाईत 5 गावे व 5 वाड्यामधील 4 हजार 528 नागरिक व 3 हजार 421 जनावरांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात जूनच्या सुरूवातीला काही भागात पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचे कोरडे पडलेले स्त्रोत पुनरूज्जीवित झाले. त्यामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे. आणखी पाऊस पडल्यावर टँकरची संख्या कमी होण्यास मदत होईल.
गौरव चक्के (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.सातारा)
SCROLL FOR NEXT