रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा दर सोमवारी बंद असतो. शनिवारी जोरदार पावसासह झालेल्या वादळामुळे शीळ धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रविवारचा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि उशिराने होण्याची भीती होती. रत्नागिरीकरांची पाण्याविना गौरसोय होऊ नये यासाठी पाणीपुरवठा समिती सभापती निमेश नायर यांनी जॅकवेलमधून पाणी खेचणारे पंप जनरेटरवर सुरु करा आणि पाणी पुरवठा करावा, अशा सूचना केल्या. त्यामुळे रविवारी शहरवासियांना पुरेसे पाणी मिळू शकले.
रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा दर सोमवारी बंद असतो. पावसाळा नियमित सुरु होईपर्यंत पाण्याची बचत करण्यासाठी आणि धरणावरील वीज पुरवठा दर सोमवारी बंद राहत असल्याने हे नियोजन करण्यात आले. सोमवारी पाणी येणार नसल्याने रविवारी पाणीपुरवठा योग्यरित्या होणे आवश्यक असते. परंतु शनिनवारी संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी हा बिघाड दुरुस्त होणार असल्याने रविवारीही पाणीपुरवण्यात व्यत्यय येण्याची भिती होती.
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. धरणावरील पाणी जनरेटरवरच्या पंपाने खेचण्यासाठी प्रतिदिन १०० लिटर डिझेलची आवश्यकता असते. हा डिझेलचा खर्च टाळला असता तर रत्नागिरीकरांना रविवारी पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकला नसता. सोमवारीही पाणीपुरवठा बंद राहून शहरवासियांची पाण्याची फारच गैरसोय होण्याची भीती होती.
त्यामुळे पाणी समिती सभापती निमेश नायर यांनी जनरेटरने पंप सुरु करून पाणी खेचण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार कार्यवाही झाल्याने रविवारी रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळाले. शनिवारी समाजमाध्यमावर रविवारी पाणी उशीराने आणि कमी दाबाने येणार असल्याचे संदेश फिरत होते, परंतु सभापतींच्या दक्षतेमुळे ही वेळ आली नाही.