Rape Case Pudhari
सातारा

Rape Case: लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार

विवाहित महिलेची घटस्फोटाची केस सुरू असल्याचे माहिती झाल्यानंतर तिला लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्यावर घरात, कॅफेमध्ये, कास रोडवरील हॉटेल, पाचगणी येथील व्हिलामध्ये बलात्कार केला

पुढारी वृत्तसेवा

सातारा : विवाहित महिलेची घटस्फोटाची केस सुरू असल्याचे माहिती झाल्यानंतर तिला लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्यावर घरात, कॅफेमध्ये, कास रोडवरील हॉटेल, पाचगणी येथील व्हिलामध्ये बलात्कार केला. तसेच अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झाली असल्याचे समोर आले आहे.

प्रतीक दिलीप वाघमारे (रा. गोडोली, सातारा) याच्या विरुद्ध विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. पीडित महिलेने तक्रारीत असे म्हटले आहे की, बलात्काराची घटना जुलै 2024 पासून मार्च 2026 या कालावधीत घडली आहे. जानेवारी 2023 मध्ये पीडित महिलेची संशयिताची इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली. यातूनच संशयित हा त्या महिलेला भेटू लागला. त्या महिलेची घटस्फोटाची केस सुरू आहे. याची माहिती संशयित आरोपीला झाल्यानंतर त्याने या महिलेला लग्न करतो असे आमिष दाखवले. संशयिताने जुलै 2024 मध्ये पीडित महिलेला त्याच्या घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.

या घटनेनंतर कास रोडवरील एका हॉटेलमधील रुममध्ये संशयिताने पिडीत महिलेला नेले. तेथे त्याने दोघांमध्ये झालेल्या शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप दाखवली. या घटनेने महिला घाबरली. तो व्हिडीओ डिलीट करण्याची महिलेने विनंती केली. त्याआधारे त्याने महिलेला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. व्हिडीओचा वापर करुन संशयित महिलेला पाचगणी येथील सफायर मून लाईट व्हिला येथे नेवून संशयिताने पुन्हा अत्याचार केले.

संशयिताने ब्लॅकमेलिंग करत डिसेंबर 2025 मध्ये देवी चौकातील कथा कॅफेमध्ये नेवून अत्याचार केला. अत्याचाराच्या त्रासाला कंटाळल्याने महिलेने पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे सांगितले असता संशयिताने दोघांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर संशयिताने लग्न करण्यास टाळाटाळ केली. यामुळे महिलेने अखेर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता विरुध्द बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT