रणजितसिंह निंबाळकर  File Photo
सातारा

Satara Politics : रणजितसिंहांचे यश फलटणच्या राजकारणासाठी टर्निंग पॉईंट

तीस वर्षांच्या वर्चस्वाला जनतेने नाकारले; नवीन राजकीय समीकरणांचा प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पोपट मिंड

फलटण : फलटण नगरपालिकेच्या निवडणूक निकालाने केवळ सत्ता बदल घडवला नाही, तर गेल्या तीस वर्षांत रुजलेल्या राजकीय वर्चस्वाला मतदारांनी नकार दिला. अभेद्य मानल्या जाणाऱ्या आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटाचा पराभव आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप-राष्ट्रवादी युतीचा निर्णायक विजय हा फलटणच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट ठरला आहे.

फलटण नगरपालिका निवडणुकीतील रामराजे गटाचा पराभव हा एका घटकामुळे झाला नसून त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. दीड-दोन वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने विकासकामांवर मरगळ आली होती. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा मूलभूत प्रश्नांवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. यासोबतच राजे गटातील विश्वासू सहकाऱ्यांची गळती, काही प्रभागांमध्ये प्रभावी उमेदवार उभे करण्यात आलेले अपयश आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यात आलेली मर्यादा हे घटक निर्णायक ठरले. उघड बंड झाले नाही, मात्र आतून असहकार वाढत गेला. ऐनवेळी राजे गटाने शिवसेनेत घेतलेला पक्षप्रवेश, सत्तेत नसल्यामुळे प्रशासनाकडून न मिळणारे सहकार्य यामुळे कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे यांच्यावर मतदारांच्या संपर्कात नसल्याच्या आरोपाचे खंडण करण्यात आलेले अपयश, केलेल्या विकास कामांचा जनतेपुढे प्रभावीपणे लेखाजोखा मांडण्यात आलेले अपयश, या व अनेक कारणांमुळे राजे गट बॅकफूटवर गेला. राजे गटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना भूमिका मांडताना मतदारांना आ. रामराजेंचे कार्य पटवून देता आले नाही. आपल्या राजकीय कारकिर्दीत आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लावलाच शिवाय इतरही कामे केली मात्र जनतेसमोर हे ठामपणे मांडणारी फळी कमी पडली. हाही एक महत्त्वाचा मुद्दा राजेगटाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला.

जवळच्या आणि हक्काच्या मातब्बर कार्यकर्त्यांचे निवडणूक प्रक्रिया काळात झालेले पक्षांतर त्यामुळे बसलेला फटका. प्रभाग एक, दोन, तीनमध्ये विरोधकांनी मारलेली मुसंडी, वॉर्ड क्रमांक पाच व सहामध्ये विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्यात आलेले अपयश. याबरोबरच राजे गटातील कार्यकर्ते एकसंघपणे लढताना दिसून आले नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ हेही पराभवाचे कारण आहे. विधानसभेला सहा हजारांनी पिछाडीवर असलेल्या राजेगटाने नगरपालिका निवडणुकीत ही पिछाडी 600 वर आणली ही त्यांची एवढीच काय ती जमेची बाजू ठरली.

काही प्रभागात राजे गटाकडून दिलेली उमेदवारी मतदारांना पचनी पडली नाही. त्याचा थेट फायदा विरोधकांनी उचलला. 2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत 25 पैकी 17 नगरसेवक राजे गटाचे होते. यावेळी हीच परिस्थिती उलटी झाली. 27 पैकी 18 नगरसेवक भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. रणजितसिंह यांच्या विजयाचे गणित तपासले तर नियोजन, संयम आणि बदल हा अजेंडा त्यांनी राबवला. खासदारकीला अपयश आल्यानंतर आमदारकी जिंकायचीच या उद्देशाने त्यांनी दुसऱ्या दिवसांपासून मतदारांची संपर्क मोहीम राबवून सहानुभूती मिळवली. त्यानंतर सत्तेच्या सोपानाचा लाभ उठवत शहराच्या चौफेर विकासाचा अजेंडा राबवला.

फलटण नगरपालिकेवर झेंडा फडकवायचाच ही खूणगाठ मनी बांधून त्यांनी खूप अगोदरपासूनच नियोजनबद्ध कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून शहरवासीयांचा विश्वास संपादन केला. बूथ लेवल मॅनेजमेंटचा मास्टर स्ट्रोक रणजितसिंहांनी मारला. भावनिक भाषणापेक्षा नियोजनावर भर दिला. मतदार याद्या घराघरात पोहोचवणारे कार्यकर्ते आणि स्थानिक प्रश्नावर लक्ष केंद्रित रणनीती यामुळे रणजितसिंहांना विजय शक्य झाला. फलटणचा निकाल म्हणजे केवळ आ. रामराजेंचा पराभव किंवा रणजितसिंहांचा विजय नाही तर परंपरागत वर्चस्वाला मतदारांनी दिलेला इशारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT