फलटण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने रामराजे नाईक निंबाळकर अस्वस्थ झाले असून, त्यामुळे त्यांची वक्तव्ये दिवसेंदिवस खालच्या पातळीवर जात आहेत. साखरवाडी येथे बोलताना त्यांनी मुलीबाळींवर केलेली टीका अत्यंत घृणास्पद आणि अक्षम्य आहे. सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या रामराजेंचा हाच का तो सुसंस्कृतपणा, असा सवाल करत ‘रामराजेंची बुद्धी भ्रष्ट झाली असून त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे,’ अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
श्रीराम कारखान्याच्या अनुषंगाने साखरवाडी येथे रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नरसिंह निकम, युवानेते अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, रामराजेंच्या शिव्यांकडे मी लक्ष देणार नाही. मात्र, नातीच्या वयाच्या असलेल्या मुलींवर व त्यांच्या कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणे हे निषेधार्ह आहे. मुलीबाळींवर संशय निर्माण करून राजकारण करणे हे खानदानीपणाचे लक्षण आहे का? एवढ्या खालच्या पातळीवरची टीका करूनही टाळ्या वाजवल्या जात असतील, तर ही बाब अधिक गंभीर आहे. ज्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही स्वाभिमान शिल्लक राहिलेला नाही, त्यांनी आम्हाला सुसंस्कृतपणाचे धडे देऊ नयेत. साखरवाडीकरांनीही अशा वक्तव्यांना टाळ्यांनी प्रतिसाद देणे थांबवावे.
रणजितसिंह म्हणाले, मी पोलीस गाड्या घेऊन फिरतो म्हणून त्यांना मला मारायचे आहे का? गोळ्या घालायच्या आहेत का? मला मारण्यासाठी दोन वेळा सुपारी देण्यात आली होती. कुठेही बोलवा, मी एकटा येण्यास तयार आहे. आम्ही विकासकामे करत आहोत; मात्र त्यांना विकास दिसत नाही. सतत नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीराम कारखान्यासाठी आम्ही तिघांनी सात कोटी रुपये टाकावेत, असे सांगणाऱ्या श्रीमंतांनी स्वतः पैसे टाकून कारखाना चालवावा. आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. जनतेकडून पैसा गोळा होणार नाही. ‘तुम्ही एक नंबरचे थापाड्या आहात. अफवा पसरवण्यात माहीर आहात. धारूच्या कर्तृत्वावर बढाया मारता. धारूचेही कारणामे मला समजले आहेत योग्य वेळी तीही बाहेर काढले जातील. वय झालं तरी खालच्या पातळीवर बोलता, मुलीबाळींवर संशय निर्माण करता; हेच का खानदानी माणसांचे लक्षण?’ असा सवालही रणजितसिंहांनी केला.
आ. सचिन पाटील म्हणाले, ‘साखरवाडीच्या कन्येवर केलेली टीका अत्यंत निषेधार्ह आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. सभापती योग्य पद्धतीने सर्व स्तरांवर जनतेची कामे करत आहेत. त्यांच्या बाबतीत रामराजेंनी वापरलेले शब्द निषेधार्ह आहेत. रणजितदादांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास रामराजेंना बघवत नाही. आता त्यांनी फक्त शिव्या द्याव्यात; आम्ही विकासकामे करत राहू. सर्वच निवडणुकांमध्ये जनता तुमच्या विरोधात गेली आहे, हे समजून घ्या आणि आता निवांत राहा. श्रीराम मंदिरात बसून नामस्मरण करा, असा खोचक सल्ला आ. पाटील यांनी रामराजेंना दिला.
सहकार बंद पाडणे एवढेच तुम्हाला जमते...
मलोजीराजे सहकारी बँकेची काय स्थिती झाली होती. दूध संघ, खरेदी-विक्री संघ यांसारख्या सहकारातील संस्थांचे काय झाले? तुम्ही कोणती संस्था निर्माण केली? पूर्वजांनी उभ्या केलेल्या संस्था तरी तुम्हाला नीट चालवता आल्या नाहीत. सहकार बंद पाडणे एवढेच तुम्हाला जमते, मी माझ्या वडिलांच्या नावाने कारखाना उभा केला आणि तो चांगल्या प्रकारे चालवला. दूध संघ सात वर्षे चालवला. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर कोणती संस्था निर्माण केली, हे जनतेला सांगा, असे आव्हानही रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी दिले.