फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत असताना या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे व त्यांचे स्वीय सहायक यांचे नाव विरोधकांकडून गोवण्यात आले होते. उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी थेट आरोप केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील गजानन चौकात आज सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी खुली पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून विरोधी नेत्यांकडून रणजितसिंह ना. निंबाळकर यांना घेरण्यात आले. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले. त्यानंतर रणजितसिंह यांनी सामाजिक माध्यमांवर आपण संविधानिक मार्गाने उत्तर देऊ, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. दरम्यान, सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सुषमा अंधारे या फलटण दौऱ्यावर येणार आहेत. त्यादिवशी संध्याकाळी 6 वाजता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खुली पत्रकार परिषद आयोजित केल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी पत्रकारांना सांगितले. जाधव म्हणाले, सुषमा अंधारे, मेहबूब शेख, विधान परिषद माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.