Ranjitsinh Nimbalkar File Photo
सातारा

Ranjitsinh Nimbalkar: मला ‘मल्ल्या’ म्हणणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास पहावा; रणजितसिंहांचे रामराजेंना उत्तर

त्यांना सहकारावर बोलण्याचा अधिकार नाही

पुढारी वृत्तसेवा

फलटण : मी खाजगी कारखाना काढला म्हणून सहकार संपला, हा आरोप हास्यास्पद आहे. संजीवराजेंनी सहकारी दूध संघ असताना स्वतःचा दूध व्यवसाय का सुरू केला? तिघा भावांनी तासगाव येथे खाजगी साखर कारखाना काढण्याची घोषणा केली होती की नाही? स्वतः सर्व काही करायचे आणि दुसऱ्यावर बोट दाखवायचे, ही त्यांची पद्धत आहे.

सहकारावर बोलण्याचा नैतिक अधिकार रामराजे आणि त्यांच्या बंधूंना नाही. दूध संघ, मालोजीराजे बँक, श्रीराम सोसायटी यांचे काय झाले, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. मला ‘मल्ल्या’ म्हणणारे रामराजे हेच फलटणचे खरे ‘मल्ल्या’ आहेत. मालोजीराजे बँक बुडवणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करुन स्वत:चा इतिहास पहावा, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर देत रामराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल केला.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, ‘माझा कारखाना महाराष्ट्रात नावारूपाला येत आहे. भारतातील सर्वात मोठा डिस्लरी प्रकल्प आणि जगातील १५० टन क्षमतेचा सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प आम्ही उभारत आहोत. ही प्रगती पाहूनच विरोधकांना अस्वस्थता येत आहे. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून फलटणला मोठ-मोठे प्रकल्प मिळत आहेत. विमानतळ, पाणीप्रश्न आणि इतर विकासकामांसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. तालुक्यात विकासाची लक्ष्मी येत असताना काहींना त्याचे दुःख होत आहे. शिक्षकांकडून अडीच टक्के कमिशन कोण घेतय, शिक्षक व्यापाऱ्यांच्या ठेवी कुठे गेल्या? ॲकॅडमी, व्यापारी गाळे, शहरातील मोकळ्या जागा या सर्व बाबी बाहेर काढण्याची वेळ आली आहे.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, श्रीराम कारखान्याबाबत न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली. गोपनीय जाहिराती देण्यात आल्या. दोनच टेंडर कसे आले? बैठकीपूर्वीच 'दत्त इंडिया' कारखाना चालवणार असल्याची माहिती तालुक्यात कशी पसरली? या सर्वाची चौकशी व्हावी."

शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, ‘निंबाळकर घराण्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने केलेले वक्तव्य अत्यंत बालिश आहे. ‘साठ वर्षे विषारी नाग जोपासला’ असे म्हणणे वास्तवाला धरून नाही. माझे वयच साठ वर्षे नाही. त्यामुळे हा आरोप किती तथ्यहीन आहे, हे स्पष्ट होते. श्रीराम साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा, यासाठी मी आग्रही भूमिका घेतली आहे, तर रणजितसिंह यांनीही नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे.

दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यानच जवाहर समूहाचे प्रमुख प्रकाश आवाडे यांना दूरध्वनीवरुन फोन लावला. यावेळी आवाडे यांनी ‘कारखाना सोडण्यासाठी आपण आमच्यावर कधीही दबाव आणला नाही. उलट प्रत्येक भेटीत कारखाना कसा चालला, काही अडचण आहे का?, अशी विचारपूस करत होतात. कारखाना तुम्हीच चालवा, असा आग्रहही तुम्ही केला होता. मात्र आर्थिक अडचणी आणि वाढते नुकसान यामुळेच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. करार मोडण्यासाठी राजकीय दबाव होता, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे’, असे स्पष्ट सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT