सातारा : माढ्याचे माजी खासदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समर्थक रणजितसिंह ना. निंबाळकर डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने पुरते चक्रव्यूहात अडकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये येऊन त्यांच्या बाजूने शेरोशायरी करून त्यांना क्लीन चिट दिल्यानंतरही त्यांच्या विरोधात दुसर्यादिवशीही राज्यभरातून आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. रणजितसिंह निंबाळकर हा चक्रव्यूह कसा भेदणार? याविषयी राजकीय वर्तुळातही उत्सुकता आहे.
माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर अचानकच नॅशनल न्यूज झाले आहेत. यापूर्वीही ज्या माढ्याचे शरद पवार खासदार होते. त्याच माढ्यात भाजपचे पहिले खासदार झाल्याने रणजितसिंह थेट मोदी-शहांच्या आवडत्या कार्यकर्त्यांच्या यादीत जाऊन पोहोचले होते. मात्र लोकसभेतील पराभवानंतरही रणजितसिंह अॅक्टिव्ह दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ताकद व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची साथ यामुळे पराभवानंतरही फलटणमध्ये रणजितसिंहांचीच चलती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार रामराजे निंबाळकरांच्या उमेदवाराविरोधात निवडून आणून रणजितसिंहांनी तो आपल्याच गोटात ठेवण्यात यश मिळवले आहे. रामराजे ना. निंबाळकर यांना बॅकफूटवर आणून रणजितसिंहांचे साम्राज्य सुरू झाले असतानाच फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात रणजितसिंहांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात डॉ. संपदा मुंडे यांच्या झालेल्या चौकशीला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या अहवालात खासदार व त्यांच्या दोन पीएंनी फोन केला होता, असा उल्लेख केला आहे. त्यावरूनच माजी खासदार असलेल्या रणजितसिंहांवर सर्व बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रणजितसिंहांनी आरोप फेटाळत निपक्ष चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत रणजितसिंह रडलेही. एवढेच नाही, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट देताना जराशीही मला शंका आली असती, तर मी या कार्यक्रमाला आलो नसतो, असे सांगून रणजितसिंहांविरोधात निंदनीय राजकारण सुरू असल्याचा आरोप केला.
संबंधित युवतीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी रणजितसिंहांच्या नेेतृत्व गुणांचे कौतुकही केले. मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटमुळे व दोन आरोपींच्या अटकेमुळे प्रकरण थांबेल, असा समज होता. मात्र, मुख्यमंत्री गेल्यानंतर सोमवारी दिवसभर राज्यभरातून रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यातच काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट फलटणच्या विषयावर भाष्य केल्याने पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर हे नॅशनल न्यूज झाले. आधीच खा. संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. सोमवारी दिवसभरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रणजितसिंहांचे नाव घेवून त्यांच्यावर तोफ डागली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते मेहबूब शेख यांनी स्वराज कारखान्याचा उल्लेख करत रणजितसिंहांना टार्गेट केले. विरोधी पक्षांनी चक्रव्यूह टाकले असतानाच स्वकीयांमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही थेट नाव घेवून रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टिका केली आहे. तर भाजपनेत्या पंकजा मुंडे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हणत आहेत. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत ‘फडणवीसांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास आहे’ असे म्हणणारे रणजितसिंहांचे मुख्य विरोधक विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर नेमके काय करत आहेत याविषयी सातारा जिल्ह्यात चर्चा सुरु आहेत. डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरुन रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या विरोधात उडत असलेली राळ थांबणार का? रणजितसिंह हा चक्रव्यूह कसा भेदणार? आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना ते उत्तर कसे देणार? याविषयी कुतुहल आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात थेट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि डीवायएसपी खांबे यांना फोन लावून तिखट शब्दांत इशारा दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी बोलताना ते म्हणाले, तुमच्याकडून संपदाताई आणि त्या पीएसआयला फोन गेले होते. तुम्ही संपदाताईला न्याय दिला नाही तर तुम्ही फटके खाणार...असे वक्तव्य पाटील यांनी केले. तर डीवायएसपी खांबे यांच्याशी झालेल्या संभाषणामध्ये डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांना पत्र दिले होते. तुम्ही जालण्याला होता का? मग तुम्ही तर आरोपींचे सरदार... न्याय कसा मिळणार? संपदाने तुमच्याकडे तक्रार दिली होती का? असे सवाल पाटील यांनी त्यांना विचारले. ही क्लिपही समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.