Ranjitsinh Nimbalkar: रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर रणजितसिंहांची बुलेट राईड 
सातारा

Ranjitsinh Nimbalkar: रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर रणजितसिंहांची बुलेट राईड

गजानन चौकातही एंट्री : एकटे जात विरोधकांना ललकारले

पुढारी वृत्तसेवा

फलटण : फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या संघर्षाला आता आक्रमक वळण मिळाले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘पोलिस प्रोटेक्‍शन घेऊन का फिरता? एकटे या’ या रामराजे ना. निंबाळकर यांच्‍या आव्‍हानाला प्रत्‍युत्तर देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट गजानन चौकात ‘बुलेट’वरून राईड मारली. त्यानंतर ते थेट रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर एकटे जात विरोधकांना ललकारले.

आ. रामराजेंनी दिलेल्या आव्हानानंतर बुधवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर कोणताही पोलिसांचा ताफा न घेता ‘बुलेट’वरून थेट गजानन चौकात दाखल झाले. ते दाखल होताच तेथे कार्यकर्त्यांनी गराडा घातला. मात्र, रणजितसिंहांनी स्वतः कार्यकर्त्यांना दूर राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी गजानन चौकातून ‘बुलेट’वरून फेरफटका मारत थेट रामराजेंच्या निवासस्थानाबाहेर काही काळ ठाण मांडले.

फलटणच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘राजकारणात ते कायम पोलिसांचा फौजफाटा घेऊन फिरतात, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने फिरून दाखवावे,’ असे आव्हान आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या आव्हानाला रणजितसिंहांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिल्याने फलटणच्या राजकारणातील वातावरण आणखी तापले आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात फलटणमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, दोन्ही गटांतील समर्थकांमध्येही या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

मी समोर येतो तेव्हा ते बिळात लपतात

पत्रकारांशी संवाद साधताना रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, कोणताही पोलिसांचा फौजफाटा न घेता मी एकटा आलो आहे. ज्यांनी ज्यांनी मला आव्हान दिले, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी इथे यायला पाहिजे होते. मी समोर येतो तेव्हा ते कुठे बिळात लपून बसतात का? तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही इथे यायला हवे होते. हे बिळात जाऊन बसतात आणि कार्यकर्त्यांना पुढे करतात. माझ्या पोलिसांच्या प्रोटेक्शनची यांना नक्की काय अडचण आहे, हे आजपर्यंत मला कळलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT