फलटण : आत्महत्या प्रकरणातील आरोप करणार्या सर्वांना बोलवा आणि नार्को टेस्ट व लाय डिटेक्टर करा. यात तथ्य आले, तर जेलमध्ये जाईन. ताईंनी अपुर्या माहितीच्या आधारे आरोप केले. त्यांना कुणी माहिती पुरवली? तुम्ही म्हणाल तिथे लाय डिटेक्टर घ्या, रणजित आरोपांना घाबरणारा नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेली ‘क्लीन चिट’ माझे चरित्र बघून दिली आहे. होऊन जाऊ दे कशाला घाबरायचं. माझं जाहीर आव्हान आहे, कधी येतायं लायडिटेक्टर चाचणीला. मुंबईमध्ये भर चौकात लायडिटेक्टर टेस्ट घ्या. काय विचारायचे ते विचारा, कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही. लायडिटेक्टरला समोर या नाहीतर जाहीर माफी मागा, असे आव्हान माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी आ. रामराजे ना. निंबाळकर यांना दिले.
आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी आरोप केल्यानंतर रणजितसिंह यांनी पत्रकार परिषद घेत जयश्री आगवणे, सुषमा अंधारे यांच्यासह आरोप करणार्या ऊसतोड मुकादमांची पुराव्यासह चिरफाड केली. यावेळी आ. सचिन पाटील, समशेरसिंह ना. निंबाळकर, अनुप शहा, शिवरूपराजे खर्डेकर, दिलीपसिंह भोसले आदी उपस्थित होते.
रणजितसिंह म्हणाले, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही. तुम्ही तालुक्याची बदनामी केली. तुम्ही कुणाला धमक्या दिल्या. तुमच्या करतुकीचा पाढा वाचायचा असेल तर ही सभा पुरणार नाही. रणजित पेट्रोल चोर, विनयभंग करणारा, गाडी चोरणारा असे आरोप माझ्यावर झाले. आता राहिले ते आत्महत्याप्रकरण, त्यातही गुन्हा दाखल केला असता, तपास करून घ्यायचा होता. त्यापेक्षा एखादी गोळी तरी घालायची होती, किती सहन करायचं मी. मी ओरिजनल 96 कुळी आहे, डुप्लिकेट नाही. 1200 वर्षांचा इतिहास आहे असे म्हणत रणजितसिंहांनी वंशावळ दाखवली. ते म्हणाले, आरोप करायचे असतील तर डोक्याचा वापर करून करायचे ना. किती बदनामी करायची याला लिमिट आहे. ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांची मी लिस्ट केली आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले त्या सर्वांवर फौजदारी दाखल करणार आहे.
मालोजी बँक बुलढाणा पतसंस्था चालवते ही त्यांची मर्दुमकी. कर्जमाफी झाली नसती तर काय झाल असतं हे त्यांच त्यांना माहिती. कारखाना आवाडेंना चालवायला दिला आहे. दूध संघाचा लिलाव झाला हे त्यांचे कर्तृत्व आहे. खरेदी विक्री संघ मिस्टर इंडिया झालायं. बाजार समितीत दोन महिने गाळेधारक अडचणीत आले आहेत. डॉक्टर ताईंचा हे पुतळा बांधायला निघालेत. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व सईबाईंचा पुतळा बांधला नाही, यांनी संभाजी महाराजांचे पुतळे बांधले नाहीत. महापुरूषांच्या पुतळ्यांना निधी आम्ही आणल्यानंतर तेव्हा यांना संभाजी महाराज आठवले. या ताईंचा पुतळा बसवायचा असेल तर त्याला मदत करू.
या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. हा खटाटोप रणजितला बदनाम करण्यासाठी सुरू आहे. ताईबाबत सहानभूती होती तर जायचं होत बीडला. त्यांच्या पत्रात रणजितला ओढता येईल, मुख्यमंत्र्यांचा दौरा हाणून पाडता येईल, यासाठी हे कारस्थान केले. या आत्महत्येशी माझं नाव जोडून तिन्ही भावांनी बदनाम केले. आम्ही गरीब कुटुंबातून पुढे आलो आहे. माझ्या वडीलांनी हॉटेल व कारखान्यात काम केले. त्यांच्या मुलाने बापाच्या नावाने कारखाना उभा केला. आज यांचे धंदे काय जुनं विकायचं. त्यांनी मंत्री असताना हजारो एकर जमिनीवर कब्जा केला. आम्ही रूपायाला कुणाचं मिंधं नाही. त्यांच्या तोंडून नुसतं घाणचं बाहेर पडते, चांगलं कधी बाहेर पडत नाही. बहिणीचे चारित्र्यहनन होवू नये म्हणून मी शांत होतो. मात्र, गटर चालू झाल्याने संशय निर्माण होईल म्हणून उत्तर दिले.
दिगंबर आगवणे यांनी पैशासाठी कॉम्प्रमाईज केले. हफ्त्यासाठी कर्मचारी त्यांच्या दारात गेल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी दिली. 226 कोटींचे कर्ज हे साखर कारखान्याच्या मालमत्तेवर काढले. त्याच्या वडीलांची मालमत्ता ही सहतारण केली. ही मालमत्ता काढूनही दिली. त्यावेळी त्यांनी एकाच बँकेचे तीन तारण चढवले. तेथूनच आमचे वाद सुरू झाले. 2013 मध्ये आगवणेंनी कुठली निवडणूक लढवली? पण त्यासाठी कर्ज काढल्याची खोटी तक्रार केली. खासदार असताना न्यायालयात अर्ज झाले. त्यानंतर न्यायालयाने चौकशी केली. यानंतर न्यायालयाने आगवणेंविरोधात बी समरी काढली. त्यामुळे आगवणे यांना केव्हाही अटक होवू शकते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आ. रामराजे तेव्हा सभापती होते. त्यावेळी पोलिसांनी मला 21 वेळा बोलावलं.
डॉ. संपदा मुंडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू होती. त्यांनी खासदार आणि त्यांच्या पीए ने दबाव टाकल्याचे म्हटले. हे प्रकरण सहा महिन्यांपूर्वीचे आहे आणि मी तेव्हा खासदार नव्हतो. असंच प्रकरण जयकुमार गोरे यांच्याबाबत होते. ना. गोरे यांचे मंत्रीपद घालवण्यासाठीही यांनी षडयंत्र रचले असल्याचा आरोप रणजितसिंह यांनी केला.
रामराजे दोन वेळा आले होते मनोमीलन करायला, पण मी नको म्हणालो. चुकीचा पायंडा पाडून दहशत निर्माण करायची, माझचं ऐकलं पाहिजे या भूमिकेमधूनच अधिकार्यांना बदनाम करायचे काम आपल्या महाभागांनी केले. पब्लिक सांगतंय यामागील मास्टरमाईंड रामराजे आहे. माझी सद्सदविवेक बुद्धी मला सांगते आहे, 78 वयाच्या माणसाला जेलमध्ये बसवून त्यांच्याकडून चक्की पिसून घेण्यात आनंद नाही. रामराजे मी क्षमा केली आहे. पुन्हा करणार नाही, असा इशारा रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी दिला.