Ramraje Nimbalkar  Pudhari Photo
सातारा

‌Ramraje Naik Nimbalkar | ‘पंतप्रधान म्हणून शोभणारे केवळ देवेंद्र फडणवीसच‌’ : आ. रामराजे

सातारा जिल्ह्यातील त्यांची माणसे मात्र बदनाम

पुढारी वृत्तसेवा

फलटण : ‘मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, असा सल्ला दिलेला कार्यकर्ता आहे; मात्र माझे म्हणणे आहे की, आजच्या घडीला पंतप्रधान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस हेच सर्वाधिक स्वीकारार्ह आणि योग्य आहेत. त्यांना मी भाजपचे नेते म्हणून नव्हे, तर एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून पाहतो,‌’ असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील त्यांची माणसे मात्र बदनाम असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेप्रसंगी ते बोलत होते. आ. रामराजे नाईक-निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अनेक दशकांपासून त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. आज त्याच रामराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुलेपणाने स्तुतिसुमने उधळत, ते पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याची टिप्पणी केल्याने या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

आ. रामराजे म्हणाले, ना. देवेंद्र फडणवीसांवर आमचा विश्वास आहे. त्यांच्या न्याय बुद्धीवर विश्वास आहे. त्यांच्या व्हिजनवरही आमचा विश्वास आहे. परंतु, देवेंद्रजी तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरलीत ती तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाहीत. तुमचं चांगलं करिअर, आम्ही जे बघतोय. माझ्या 30 वर्षे अनुभवाची एकच इच्छा आहे. मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत, हे स्वप्न बघितलेला कार्यकर्ता आहे. पण माझंही म्हणणं आहे की, महाराष्ट्रातील आत्ताच्या घडीला पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडवणीस हेच आहेत.

आ. रामराजे पुढे म्हणाले, देवेंद्र फडवणीस यांच्यापुढे या माणसाने (रणजितसिंहांनी) पाय धरले. परंतु, मी देवेंद्र फडवणीस यांना स्पष्ट सांगितले होते, या माणसाच्या स्टेजवर मी येणार नाही. तुमच्यासाठी घरी बसेन, देवेंद्र फडवणीस यांना दिलेला शब्द मी पाळला. खासदारकीला प्रचार केला नाही. आज उघडपणे प्रचारासाठी आलोय ते महायुतीसाठी आलोय. एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना अभय देण्याचा शब्द दिलाय, तो त्यांनी पाळलाय. कार्यकर्ते सुरक्षित राहत आहेत. आता आम्हाला काय हवंय? कार्यकर्त्यांसाठी सर्व काही करत आहे. पूर्वी फलटण शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख होती. आज आत्महत्येचे शहर म्हणून प्रसिद्ध होत आहे. यांनी गावाचं नाव खराब केलं. आठशे वर्षांची संस्कृती संपवली, असा घणाघातही आ. रामराजे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT