साखरवाडी : सातारा जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. अगोदर जाहीर होणाऱ्या निकालाचा पुढील मतदानावर परिणाम होऊ नये, यासाठी ही मागणी करत असल्याचे आ. रामराजे म्हणाले. दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनीही याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र सादर केले आहे.
जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुका न्यायालयीन कारणांमुळे दि. 2 डिसेंबरऐवजी दि. 20 डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. या दोन्ही नगरपरिषदेचे निकाल दि. 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. मात्र जिल्ह्यातील इतर नगरपरिषदा व नगरपंचायतींचे मतदान वेळापत्रकानुसार दि. 2 डिसेंबरलाच होणार असल्याने त्यांचे निकाल दि. 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. यामुळे दोन टप्प्यांत जाहीर होणारे हे निकाल, फलटण आणि महाबळेश्वरमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात.
जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या निकालांच्या प्रभावाचा फायदा अथवा तोटा फलटणच्या मतदानावर होऊ शकतो. लोकशाहीची निष्पक्षता टिकवण्यासाठी सर्व नगरपरिषदेचे निकाल एकाच दिवशी म्हणजे दि. 21 डिसेंबरला जाहीर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुका दि. 20 डिसेंबर रोजी होत आहेत. निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेचे निकाल यापूर्वी दि. 3 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यास ते मतदारांच्या मनावर प्रभाव टाकू शकतात. एका भागातील निवडणुकीचा निकाल दुसऱ्या शहरातील मतदानावर परिणाम करणं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.