सातारा

Ramraje Naik Nimbalkar : उदयनराजेंना बोलू शकणारा मी एकमेव माणूस : रामराजे

मिश्‍कील टिपण्णीने सभागृहात हास्यकल्लोळ

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा जिल्हा बँकेला कसलाही त्रास नसल्याचा निर्वाळा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी भाषणात दिला. तोच धागा पकडून विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले व आमचं प्रेम अमर आहे. मी उदयनराजेंना बोलू शकणारा एकमेव माणूस असल्याचे वक्तव्य केले. रामराजेंच्या या मिश्‍कील टिपण्णींने सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

जिल्हा बँकेची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेस बॅंकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, शिवरुपराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर, सुनील खत्री, शेखर गोरे आदी संचालक उपस्थित होते.

यावेळी काही वेळा राजकीय कल्लोळ पाहायला मिळाला. या संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सभा होती. त्यामुळे सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी डॉ. सरकाळे यांनी बँकेला सर्व संचालक मंडळाचे पाच वर्षांमध्ये मार्गदर्शन लाभल्याचा आवर्जुन गौरव केला. हे करत असताना त्यांनी उदयनराजे भोसले यांचा कसल्याच प्रकारचा त्रास नसतो, असा उल्लेख केला.

त्याचवेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उदयनराजे यांनी सभागृहात हात जोडले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही भाषणात याविषयावरून चिमटे काढले. ते म्हणाले, डॉक्टर साहेबांनी उदयनराजे त्रास देत नसल्याचे म्हटले आहे; पण महाराज आपले दर्शन त्रास देण्यासाठी तरी व्हावे, त्यांना बोलू शकणारा मी एकमेव आहे. आमचं प्रेम अमर आहे. मी जास्त बोलत नाही, असे म्हणताच सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ उडाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT