सातारा

Ramraje Naik Nimbalkar | कष्टाने उभारलेल्या फलटणचा विनाश टाळा : आ. रामराजे नाईक निंबाळकर

विकासाची गती कायम ठेवण्यासाठी साथ द्या

पुढारी वृत्तसेवा

फलटण : गत 30 वर्षांत अतंत्य कष्टाने आणि निष्ठेने फलटण तालुक्याचा चौफेर विकास केला. रस्ते, सिंचन, उद्योगधंदे यासाठी नियोजनबद्ध काम करुन तालुक्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर केला. गटातटाचे राजकारण संपुष्टात आणून तालुक्यात एकोपा, शांतता प्रस्थापित केली. तालुक्याच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी रहा. फलटणकरांनो दहशतवाद झिडकारून निर्भयपणे तालुक्याचा विनाश रोखा, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.

शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या सांगता प्रचार पदयात्रेत सिने अभिनेते गोविंदा व मान्यवर सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर उपस्थित होत्या.

आ. रामराजे म्हणाले, फलटण तालुक्यात अलीकडच्या काळात दहशतीचे राजकारण सुरू झाले आहे. आज जे लोक मत मागायला येत आहेत त्यांच्याकडे दहशतीशिवाय काहीही नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रशासकीय दहशतवाद वापरून लोकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. तालुक्याला गुंडगिरी व चुकीच्या आर्थिक राजकारणातून मी बाहेर काढलं आहे. बंद पडलेला श्रीराम कारखान्याला ऊर्जितावस्था दिली. साखरवाडी कारखानाही सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण उभे करण्याचा प्रयत्न केला. कमिन्स सारखा प्रकल्प आणला. त्यात हजारो सुशिक्षितांना रोजगार मिळाला. तालुक्याच्या अर्थकारणाची घडी गतिमान झाली. राजकीय ताकतीच्या आधारे आजवर हजारो कोटींची विकास कामे केली आहेत. मी काहीच केलं नव्हतं तर खासदारकीच्या वेळी ते माझ्या पाया पडायला का आले होते? असा सवालही आ. रामराजे यांनी केला.

आ. रामराजे म्हणाले, 15 वर्षे मंत्रीपद, 7 वर्षे सभापतीपद या काळात शरद पवार यांच्याकडे मी सातत्याने पदाऐवजी फलटणच्या पाण्यासाठी मागणी केली. धोम बलकवडीच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात यशस्वी झालो. कृष्णा खोरेच्या माध्यमातून पाणी अडवण्यासाठी खटाटोप केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी थांबलं गेलं. अन्यथा पाणीच अडवलं गेलं नसतं तर मोठा अनर्थ झाला असता ही बाब विरोधक विसरतात. सिंचनाची पायाभूत बाब सक्षम करण्याचं काम प्रामाणिकपणे केल्याने आज पाण्यावर आपला हक्क राहिला आहे. पाण्यासाठी केलेला संघर्ष तरुण पिढीने समजून घेण्याची गरज आहे. फलटणचा विकास हाच माझा ध्यास आहे. तालुक्यातील जनतेचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी मी नवीन पिढी पुढे आणत आहे. जोपर्यंत विरोधकांचे आचार विचार बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना माझा विरोध कायम राहील, असेही आ. रामराजे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT