मंत्री ना. जयकुमार गोरे Pudhari Photo
सातारा

Jaykumar Gore | रामराजेंना उतार वयात प्रेम झालंय : ना. जयकुमार गोरे

जनतेचा विश्वास गमावल्याने त्यांच्यात असुरक्षितता

पुढारी वृत्तसेवा

खटाव : प्रेम करायचे एक वय असते. त्या वयात प्रेम झाल्यावर ते बहरते, मात्र आ. रामराजेंना उतार वयात प्रेम झाले आहे. आयुष्यभर सत्तेचा वापर करुन त्यांनी लोकांना त्रास दिला. अनेकांची घरे देशोधडीली लावली. आता मात्र जनतेचा विश्वास गमावल्याने त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांना उतार वयात प्रेम झालंय, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार यांनी लगावला.

पंढरपूर येथे पत्रकारांशी ना. गोरे बोलत होते. दोन दिवसापूर्वी विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर काही अटी शर्तींवर मनोमिलनाचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. मनोमिलन दोन मनांचे होते, दुसर्‍या मनालाही विचारा. मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको. फलटणच्या विकासाचे राजकारण करायचे असेल तर मनोमिलन होईल अन्यथा नाही. सत्तेचे राजकारण थांबले तर विचार करु आणि शेवटी वरिष्ठांनी सांगितले तर होईल नाहीतर मनोमिलन होणार नाही, असे सूचक वक्तव्य करुन रामराजेंनी जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. रामराजेंच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी पलवटवार केला आहे. रामराजेंनी जनतेचा विश्वास गमावल्याने त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्याचाच परिणाम म्हणून उतार वयात त्यांना प्रेम झाले असल्याचा टोला ना. गोरेंनी लगावला आहे.

ना. जयकुमार गोरे आणि आ. रमराजे यांच्यामधील टोकाचा राजकीय संघर्ष सातारा जिल्ह्यानेच नव्हे तर संपूर्ण राज्याने पाहिला आहे. दोघेही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. या दोघांमधील संघर्षामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वेळा गंभीर प्रसंग घडले आहेत. दोघांनीही अनेक वेळा एकमेकांना झोंबणारी वक्तव्ये करुन खळबळ उडवून दिली आहे. टोकाच्या राजकीय संघर्षात पोलिस केसेस, कार्यकर्त्यांच्या हाणामार्‍यांचे प्रसंग घडले आहेत. दोन्ही बाजूंनी सत्तेचा वापर करुन दबावाचे राजकारण केले गेल्याचे पहायला मिळाले आहे.

दोन दिवसापूर्वी रामराजेंनी काही अटी शर्तींवर रणजितसिंहांबरोबर मनोमिलनाचे संकेत दिले. ते संकेत त्यांनी स्पष्टपणे दिले नाहीत. त्यातही त्यांनी सत्तेचे राजकारण बाजूला सोडून विकासाचे राजकारण होणार असेल तर मनोमिलनाचा विचार होईल असे सांगितले. रामराजेंच्या या वक्तव्यानंतर ना. जयकुमार गोरेंनी टिकास्त्र सोडले.

दोन्ही बाजूकडून शह-काटशहाचे राजकारण...

या संघर्षाच्या वावटळीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही रोल तितकाच आक्रमक राहिला आहे. फलटण तालुक्याचे राजकारण दोन्ही निंबाळकरांच्या संघर्षात चांगलेच भरडून निघाले आहे. ना. गोरे आणि माजी खासदार रणजितसिंहांची मैत्री सर्वश्रुत आहे. रामराजे म्हणजे दोघांचाही वीक पॉईंट. दोघेही रामराजेंवर तुटून पडायची एकही संधी सोडत नाहीत. या वयातही रामराजेही त्यांच्या सवयीप्रमाणे ना. गोरे आणि रणजितसिंहांना वाकुल्या दाखवल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. दोन्ही बाजूकडून जशास तसे आणि तोडीस तोड शह-काटशहाचे राजकारण केले जात असल्याने गेली अनेक वर्षे हा संघर्ष तीव्र झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT