सातारा : विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे राष्ट्रवादी पक्षातील राजकीय वर्चस्व जैसे थे असल्याचेच मुंबई येथील बैठकीत स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीनंतर आ. रामराजे पुन्हा प्रवाहात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांची लावलेली हजेरी लक्षणीय ठरली. अजितदादांसोबत झालेल्या बैठकीनंतर रामराजे पुन्हा एकदा प्रवाहात आल्याचे चित्र दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या रांगेत रामराजे नाईक निंबाळकर हे बसले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व जैसे थे असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात आ. रामराजेंचे किती महत्व आहे, हे आता स्पष्ट झाले.
देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांसोबत त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात पक्ष वाढीसाठी राबवल्या जाणार्या विविध उपक्रमांवर विचारमंथन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्ष बळकट करुन अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामराजेंच्या निकटवर्तीयांनी तुतारी हाती घेऊन माजी आमदार दीपक चव्हाण यांचा प्रचार केला होता. मात्र, रामराजे या निवडणुकीत जाहीरपणे कुठेही सहभागी झाले नाहीत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती जर स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली तर रामराजेंची व्यूहरचना पक्षासाठी फायदेशीर ठरु शकते.
या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल, ना. हसन मुश्रिफ, ना. मकरंद पाटील व पक्षाचे खासदार, मंत्री, ज्येष्ठ नेते, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.