सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गांजा, बांटा गोळ्या, ड्रग्ज, गुटख्याची खुलेआम विक्री होत असून याचा तात्काळ बिमोड करावा. अन्यथा रक्षक प्रतिष्ठान आपल्या पद्धतीने ड्रग्ज विक्री करणारांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत पोलिस मुख्यालयावर धडक मारण्यात आली. दरम्यान, दै.‘पुढारी’ने साताऱ्यात गुन्हेगारीचे रक्तरंजित वास्तव, अशी वृत्तमालिका करुन लक्ष वेधले होते.
सुशील मोझर यांनी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण जिल्ह्यामधे सध्या गांजा, अंमली पदार्थ व गुटका विक्री राजरोसपणे सुरु आहे. शहरी व ग्रामीण भागातील अल्पवयीन मुले गांजा व आंमली पदार्थाचे सेवन करताना दिसत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी घटनात वाढ झाली आहे. याची माहिती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळत असेल तर पोलिसांकडे का नाही असा प्रश्नही सुशील मोझर यांनी उपस्थित केला आहे.
देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एम डी गोळ्या व इतर अंमली पदार्थ व गुटका सेवनाची क्रेझ आहे. बंदी असलेले हे पदार्थ राजरोसपणे सर्वत्र उपलब्ध होत असल्याने युवकांबरोबरच अल्पवयीन मुलेही नशेच्या विळख्यात सापडत आहेत. बाजारात सर्रास गांजा व अंमली पदार्थ विक्री होत असताना पोलिसांकडून मात्र कसलीही कारवाई होत नाही. तरी आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील गांजा, बंटा, एमडी गोळ्या व इतर अंमली पदार्थ व गुटका विक्री करणाऱ्यां विरोधात कारवाई करावी. अन्यथा रक्षक प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास रक्षक प्रतिष्ठान जबाबदार राहणार नाही. अशा आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक सातारा यांना दिले आहे.
दरम्यान, साताऱ्यातील गुन्हेगारीबाबतची वृत्तमालिका दैनिक ‘पुढारी’ने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. वाढती गुन्हेगारी तसेच नशेखोरांची दलाली यावर प्रकाशझोत टाकला आहे. अवैध पदार्थांची वाहतूक, विक्री होत असल्याने पोलिसांनी मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे.