Raju Shetti | काटामारी थांबवण्यासाठी ‘एआय’चा वापर करा : राजू शेट्टी File Photo
सातारा

Raju Shetti | काटामारी थांबवण्यासाठी ‘एआय’चा वापर करा : राजू शेट्टी

नुसते कारखानदारांच्या बाजूचे तंत्रज्ञान मान्य होणार नाही

पुढारी वृत्तसेवा

सातारा : ऊस शेतीत एआय तंत्रज्ञान आलं पाहिजे अशी भाषा मंत्री, कारखानदार करत आहेत. याला ‘स्वाभिमानी’चाही विरोध नाही. पण, साखर कारखान्यातील काटामारी थांबवण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचाही वापर करावा. नुसते कारखानदारांच्या बाजूचे तंत्रज्ञान असेल तर मान्य होणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत पवार काका-पुतण्यात एकी दिसली, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, दत्तूकाका घार्गे, मनोहर येवले, महादेव डोंगरे, शरद इंगळे, नितीन काळंगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, अलीकडील काळात ‘एआय’ तंत्रज्ञान आलं पाहिजे अशी वक्तव्ये होत आहेत. आमची भूमिका ही जगातील अत्युच्च तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशीच आहे. साखर कारखानदारांनी लालचीपणाने कारखान्यांची गाळप क्षमता वाढवलीय. गेल्यावर्षी तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने तीन महिनेच चालले आहेत. आता कारखान्यांना उसाची गरज भासतेय. यासाठी एकरी 125 टन उत्पादन निघाले पाहिजे अशी कारखानदारांची भूमिका आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान चांगले. पण, ते चोहोबाजूंनी असावे. राज्यात 200 कारखाने आहेत. या कारखान्यात ऑनलाईन वजनकाटे करा. त्यामुळे वजनाशी छेडछाड होणार नाही, अशी मागणी 8 वर्षांपासून करत आहोत. पण, याकडे दुर्लक्ष होत आहे. आताचे ‘एआय’ तंत्रज्ञान हे कारखान्यातील काटामारी थांबवण्यासाठीही वापरायला हवे.

जाणीवपूर्वक शेतकर्‍यांना फसवलं जातेय

सरकार शेतकर्‍यांवर सतत अन्याय करत आहे. सिंचनासाठी सौरऊर्जा पंप देण्यात येत आहेत. या पंपाने आवश्यक तेवढा दाब मिळत नाही. नवीन वीज कनेक्शन बंद केलीत. पश्चिम महाराष्ट्र हा डोंगरात आहे. त्यामुळे नदी, विहिरीतून दूर पाणी नेता येत नाही. यासाठी शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे. जाणीवपूर्वक शेतकर्‍यांना फसवलं जात आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT