वेणेगाव : एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना शेतीतून बेदखल करण्याचा शासनाचा कार्यक्रम सुरू आहे. माझ्या शेतकरी बांधवांची एक इंचही जमीन घेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना मुळापासून उखडून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
वर्णे ( ता. सातारा) येथील एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य राजू शेळके, माजी जि.प. सदस्या अर्चना देशमुख, प्रवीण धस्के, अर्जुन साळुंखे, दादासाहेब यादव, मनोहर येवले, रमेश पिसाळ, दत्ता थोरात, विक्रमसिंह फडतरे आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, विविध आरक्षणे व योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतून बेदखल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. शक्तिपीठ महामार्गासाठीही जमिनी घेण्याचा उद्योग सुरू आहे. वर्णे येथे २०१३ मध्ये एमआयडीसीसाठी अधिसूचना काढली. शेतकऱ्यांची संमती आहे किंवा नाही, याचा विचार न करता जमीन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा उद्योग बंद झाला पाहिजे.
राजू शेळके म्हणाले, वर्णे येथील २०१३ पासून असलेले एमआयडीसीचे भूत कायमस्वरूपी रद्द करू. शेतकऱ्यांची एकजूट हीच आपली वज्रमूठ आहे. ऊस उत्पादकांना उच्चांकी दर मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. एमआयडीसी रद्द करून सत्तेच्या जीवावर सुरू असलेल्या राजकारणाचा हिशोब चुकता करू. बाधित शेतकऱ्यांना गेली २० वर्षे भूविकास बँकेचा आणि १३ वर्षे एमआयडीसीचा शिक्का सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले.
प्रवीण धस्के व अर्चना देशमुख यांनी पुढील पिढीसाठी जमीन शाबूत ठेवायची असेल तर सर्वांनी एकत्र येऊन एमआयडीसीचे शिक्के उठवल्याशिवाय स्वस्थ बसता कामा नये. २०१३ पासून एमआयडीसीच्या नावाखाली जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. सभेपूर्वी राजू शेट्टी यांची गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जयसिंग काळंगे, योगेश काळंगे, अमोल पवार, रत्नदीप कणसे, कर्नल शरद केंजळे, सैनिक किशोर पवार, गणेश काळंगे, लक्ष्मण वाघमोडे, बळीराम वाघमोडे, नाना देवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.