Rajmata Sumitra Raje 
सातारा

Rajmata Sumitra Raje : राजमाता सुमित्राराजेंनी केले होते दुर्मिळ ग्रंथांचे दान

शैक्षणिक दातृत्वाचा अनोखा पैलू : इतिहास अभ्यासक प्रथमेश हबळेंकडून संशोधन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे यांनी १९५९ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजला इंग्रजी साहित्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे+ शेकडो दुर्मिळ ग्रंथ भेट दिले होते. लंडन आणि युरोपमध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचे साहित्यप्रेम, ज्ञाननिष्ठा आणि शैक्षणिक दातृत्व अधोरेखित होते. इतिहास संशोधक प्रथमेश हबळे यांच्या संशोधनातून राजमातांच्या व्यक्तिमत्त्वातील हा महत्त्वपूर्ण पैलू समोर आला आहे.

राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे यांची आज १०३ वी जयंती आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देताना अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येतात. सन १५ ऑक्टोबर १९२३ रोजी मध्य प्रदेशातील धार संस्थानात जन्मलेल्या उर्मिलाराजे यांचा १९३९ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्या सुमित्राराजे या नावाने साताऱ्याच्या राजघराण्यात आल्या. राजवैभवात न रमता त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याची बांधिलकी जपली. मराठी साहित्याचा सखोल व्यासंग असलेल्या राजमातांना हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांचेही उत्तम ज्ञान होते.

शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयी राजमातांना आदर होता. कर्मवीरांच्या निधनानंतर १९५९ मध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजला शेकडो दुर्मिळ इंग्रजी ग्रंथ भेट दिले. यातील काही ग्रंथांच्या पहिल्या पानावर राजमातांच्या लेटरहेडवरील ऐतिहासिक मजकूर आजही पाहायला मिळतो. प्रसिद्धीपासून दूर राहून केलेल्या त्यांच्या या ज्ञानदानाची ही महत्त्वपूर्ण साक्ष आहे. राजमातांच्या वैचारिक प्रगल्भतेचा आणखी एक पुरावा १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवी स्मरणिकेत आढळतो. या स्मरणिकेत त्यांनी 'कर्मवीर पाटील कार्यस्मृती नि स्फूर्तिमंदिर' या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचे राजमातांनी केलेले विश्लेषण त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष देते.

राजमाता सुमित्राराजे यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भता व प्रसन्नतेचा एक विलोभनीय संगम होता. साहित्यावर त्यांचे अथांग प्रेम होते. त्यांचा व्यासंग अत्यंत कठोर व चाैफेर होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेकडो ग्रंथ शिवाजी कॉलेजला दिल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
- प्रथमेश हबळे इतिहास संशोधक, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT