महाबळेश्वर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कुटुंबीयांसह गुरुवारी महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा तीन दिवसांचा मुक्काम असणार आहे. हा दौरा पूर्णतः खासगी असल्याची माहिती मिळत आहे.
थंड हवामान, निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणामुळे ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक, सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेते भेट देतात. ठाकरे कुटुंबाचेही या ठिकाणाशी विशेष नाते राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्वर विशेष प्रिय होते आणि ते दरवर्षी येथे सहकुटुंब विश्रांतीसाठी येत असत. त्याच परंपरेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही वेळोवेळी येथे येत असतात.
राज ठाकरे यांचीही महाबळेश्वरला येण्याची परंपरा असून 2018 मध्ये त्यांनी येथे मुक्काम करत श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले होते तसेच मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला होता. त्यांच्या सध्याच्या भेटीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे तीन दिवसांच्या मुक्कामासाठी आले आहेत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे सलोख्याचे संबंध असल्याने या दोघांची भेट होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.