ZP Schools Rain Holiday | झेडपीच्या 334 शाळांना पावसाळी सुट्टी File Photo
सातारा

ZP Schools Rain Holiday | झेडपीच्या 334 शाळांना पावसाळी सुट्टी

पाटण, महाबळेश्वर, जावलीतील शाळांचा समावेश; 13 ऑगस्टला भरणार शाळा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार उडवला आहे. पश्चिम भागातील दर्‍याखोर्‍यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यंदा पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर व जावली या तालुक्यांमधील डोंगरकपारीतील 334 जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्याची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1 जुलैपासून या शाळांना सुट्टी लागली असून आता 12 ऑगस्टला या शाळा भरणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. यंदा तर पावसाचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जावली, महाबळेश्वर व पाटण या तालुक्यातील शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर केली आहे. पाटण तालुक्यातील अतिवृष्टी, भूस्खलन बाधीत 186 शाळा आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील 118 व जावली तालुक्यातील 30 शाळा आहेत. त्यामुळे या भागातील प्राथमिक शाळांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दरवर्षी पावसाळ्यात सुट्टी देण्यात येत असते.उन्हाळ्यात मात्र या शाळा सुरू असतात. यंदा पाऊस अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही.

महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यामध्ये होणारी अतिवृष्टी व भूस्खलन यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू शकते. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षितता धोक्यात येवू शकते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पावसाळी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील 186, महाबळेश्वर तालुक्यातील 118 व जावली तालुक्यातील 30 शाळा अशा मिळून 334 शाळांना पावसाळी सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी दि. 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशी राहणार आहे. सर्व पावसाळी सुट्टी असणार्‍या शाळांनी पावसाळी शाळांसाठी असणार्‍या वेळापत्रकाचे पालन करावे. याबाबतच्या आवश्यक त्या सूचना गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण व जावली तालुक्यात होणार्‍या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे संबंधित शाळांना पावसाळी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
- अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT