सातारा

Satara Theft Case: रहिमतपूर पोलिसांनी लावला २४ तासांत चोरीचा छडा

जवानाच्या घरातून चोरीला गेलेल्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनचा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव : सुट्टीवर आलेल्या जवानाच्या घरातून चोरीला गेलेल्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनचा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणात एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली.

बाेरीव येथील जवान धनंजय पोळ हे २६ ऑगस्ट रोजी सकाळी घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत आंघोळीसाठी गेले होते. त्यापूर्वी त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून टेबलवर ठेवली होती. त्यानंतर ते शेतातील कामासाठी गेले. दुपारी घरी परतल्यानंतर टेबलवर ठेवलेली चेन गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात शोध घेऊनही चेन न मिळाल्याने त्यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग देण्यात आला. स्थानिक सोनारांकडून माहिती घेतली. दरम्यान, चोरीची सोन्याची चेन विक्रीसाठी एक अल्पवयीन मुलगा सराफाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून १६ ग्रॅम वजनाची सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन हस्तगत केली. विधिसंघर्षित बालकावर बाल न्याय कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, पोलिस उपनिरीक्षक एम. एम. खान यांच्यासह रहिमतपूर पोलिस पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT