कोरेगाव : रहिमतपूर नगरपालिकेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या मागे रहिमतपूरकरांनी उभे राहावे. रहिमतपूरच्या विकासाची हमी मी पालकमंत्री म्हणून देतो. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, जो खंबीरपणे शिवसैनिकांच्या मागे उभा राहतो आणि आमच्या पक्षाचे सर्व मंत्री रहिमतपूरकरांच्या विकासासाठी झटतील.
सरकारमध्ये शिवसेनेकडे नगरविकास खात्याबरोबर अनेक महत्त्वाची खाती असून रहिमतपूर शहराचा कायापालट करण्याची ताकद व धमक शिवसेनेकडे आहे. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची खंबीर साथ आहे. रहिमतपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. रहिमतपूर येथे राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी सुनील माने, वासुदेव माने, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. नंदना माने, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला माने, अविनाश माने, आनंदा कोरे, प्रा. भानुदास भोसले, रमेश माने, धैर्यशील सुपले, ॲड.नीता माने, दिलीप कदम, ॲड. दिलीप भोसले, चांदभाई आतार व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, रहिमतपूरकरांना कोणतेही चिंता करण्याचे कारण नाही. पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसाठी नगर विकास खाते, जिल्हा नियोजन समिती नगरोत्थान योजना यामधून भरघोस निधी व कामे आणून रहिमतपूर प्रगत करण्याचे धोरण आपण सर्व जण घेऊयात. यासाठी रहिमतपूरकरांनी राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या पाठीशी राहावे.
वासुदेव माने म्हणाले, स्वार्थाने पेटलेल्यांनी गावच्या विकासात खोडा घालण्याचे काम करू नये. स्वार्थासाठी सत्तेचा वापर करणाऱ्यांना जनता सत्तेबाहेर ठेवले. आमची युती ही समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारी आहे. विरोधक हे खोटं बोल पण रेटून बोल, अशा स्वरूपाचे गुंड व फसवे लोक आहेत. त्यांच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन केले. यावेळी यावेळी सूत्रसंचालन प्रा. विकास पवार यांनी केले.