सातारा : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या राधिका रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. बाजार समिती ते राधिका चौकपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे चुकवताना कसरत होत असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. एका प्रमुख रस्त्याची ही दुर्दशा पाहून ‘राधिका रस्ता अन् खाव्या लागताहेत खस्ता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पालिकेने या रस्त्याची तातडीने डागडुजी करून वाहनधारकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
पालिका प्रशासनाकडून राधिका रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. सीलकोट केल्याने या मार्गावरील वाहतुकही गतिमान झाली; परंतु यंदा अतिवृष्टीमुळे राधिका तसेच ठिकठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली. लहान-मोठ्या खड्ड्यांनी रस्त्याची चाळण केल्याने नेमका कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे.
राजपथ, खालचा रस्ता व राधिका रस्ता हे सातारा शहरातील प्रमुख तीन रस्ते आहेत. राधिका रस्ता बसस्थानकाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावर तालुका पोलिस स्टेशन, पोलिसांची नवीन वसाहत, गृहनिर्माण प्रकल्प, पेट्रोल पंप, दवाखाने, बँका व अन्य खासगी आस्थापनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. लहान-मोठ्या खड्ड्यांची संख्या इतकी भरमसाठ आहे, की एक खड्डा चुकला की दुसरा खड्डा समोर उभा ठाकतो.
या रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंप परिसरात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून मार्ग काढणे अत्यंत जिकिरीचे ठरते. रस्त्याकडेला गटारांचे बांधकाम करण्यात आले. परंतु त्यावर झाकणे बसवण्यात आली नाही. त्यामुळे ही गटारे अपघातांना निमंत्रण देत आहेत. करंजेकडे जाणार्या चौकापासून राधिका संकुलापर्यंतच्या रस्त्याची अवस्था भीषण झाली असून, दुचाकी वाहन चालवणेही कठीण बनले आहे.
कोल्ड मिक्स डांबर हा डांबराचाच एक प्रकार आहे. हे डांबर सामान्य डांबराप्रमाणे गरम करावे लागत नाही. बिटुमेनचा वापर करून ते जागच्या-जागी तयार करून त्याद्वारे खड्ड्यांची दुरुस्ती केली जाते. खड्डे दुरुस्तीचा हा एक अत्यंत जलद, सोपा व कमी खर्चिक पर्याय आहे. सातारा पालिकेकडून राजपथासह ठिकठिकाणचे खड्डे याच पद्धतीने बुजवण्यात आले आहेत. राधिका रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी याचा वापर केल्यास खड्ड्यांमुळे सुरू असलेली परवड थांबेल.
बाजार समितीचा दररोज पहाटे शेतकरी बाजार भरत असतो. या शेजारी असणार्या जुन्या संग्रहालयालगत या परिसरातील व्यापारी, व्यावसायिक हे नासलेल्या भाज्या इतर वस्तू याठिकाणी टाकत असतात. त्यातच याठिकाणी गटाराचे पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. दररोज या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. यासाठी त्यापुढेच असणार्या महावितरणच्या डीपीखाली सुद्धा कचर्याचा ढीग लागत आहे. त्यामुळे कचरा टाकणार्यांवर कारवाईची मागणी होत आहे.