File Photo
सातारा

कसली परीक्षा अन् कसले विद्यार्थ्यांचे मूल्यांकन?

गुन्हे दाखल होवूनही पॅटचे पेपर सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा
अविनाश कदम

खटाव : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट परीक्षेचे पेपर या वेळीही सोशल मीडियावर व्हायरल झाले. संबंधितांवर गुन्हे दाखल होवूनही पॅट परीक्षेचे सर्व पेपर विद्यार्थ्यांना अगोदरच मिळाल्याने कसली परीक्षा अन् कसले मूल्यांकन, सगळाच बट्ट्याबोळ असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. पेपर अगोदरच लीक झाल्याने राज्य शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे, अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुलभ करणे, अध्ययनात मागे असणार्‍या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृतिकार्यक्रम तयार करणे हे या परीक्षेचे उद्देश आहेत. मराठी, इंग्लिश आणि गणित या विषयांसाठी 3 री ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षातील सत्र एकमध्ये सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षांच्या तारखांच्या अगोदरच सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ झाला होता. पॅट परीक्षांच्या उद्देश आणि आयोजनावरच शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

त्यावेळी पॅटच्या प्रश्नपत्रिका अगोदरच व्हायरल होतात हे सातारा जिल्ह्यातील शिक्षण अधिकार्‍यांनाही माहित नव्हते. द्वितीय सत्र परीक्षा घेताना तरी शिक्षण विभागाकडून काळजी घेण्याची माफक अपेक्षा होती. मात्र तसे झाल्याचे दिसत नाही. एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षेतील पॅटचे पेपर सुरु झाले. मराठी, इंग्लिश आणि गणित भाग एक या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अगोदरच उपलब्ध झाल्या होत्या. या प्रकाराचा गाजावाजा झाल्यावर काही यूट्यूब चॅनल्सवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. इतके सगळे होवूनही आज शनिवारी होणार्‍या गणित भाग दोन या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर उपलब्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुन्हे दाखल होवूनही काही यूट्यूब चॅनल्सवर प्रश्नपत्रिका अगोदर व्हायरल होतेच कशी असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे. शासनाने असे नियमबाह्य उद्योग करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT